गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीला आता दोन-अडीच महिने राहिलेले आहेत. विधानसभेचे एका दिवसाचे अधिवेशन बोलावलेले असून ते या विधानसभेचे शेवटचे अधिवेशन ठरणार आहे. जरी ते एका दिवसाचे असले, तरी त्यात होणारे कामकाज लक्षणीय व संस्मरणीय ठरेल अशी अपेक्षा कोणीही करणे स्वाभाविक आहे. आता मुख्य मुद्दा आहे, तो आगामी निवडणुकीचा. या सभागृहाने गत निवडणुकीनंतर अनेक राजकीय बदल, दल-बदल पाहिले त्यालाच पक्षांतर असा शब्द आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रचारात ‘पक्षबदलू’ किंवा ‘फुटीर’ अशा प्रकारची विधाने आताच होऊ लागली आहेत. अशा लोकांना मतदारांनी पुन्हा निवडून देऊ नये की कोणत्याच पक्षाने अशांना उमेदवारीही देऊ नये अशी मागणी होताना दिसते. पण गेल्या काही वर्षांतील अनुभव पाहता अशा प्रकारे पक्षांतर केलेले म्हणजे एका पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आल्यावर नंतर सत्ताधारी पक्षात उड्या मारलेले काही जण जरी निवडून येत असले, तरी साधारण निम्मे तरी घरी बसत असतात, हेही वास्तव आहे. आता कोणता चमत्कार करून ते निवडून येतात, ते त्यांचे त्यांनाच माहीत. असे पक्षांतर होते, ते जास्त करून विरोधी गटांतूनच. त्यामुळे तो गट नेहमीच अशा प्रकारे उड्या मारणाऱ्यांना लक्ष्य करत असतो. पण टाळी एका हाताने वाजत नाही हेही तेवढेच खरे. गत म्हणजे २०२२ मधील निवडणुकीनंतर विरोधी काँग्रेस पक्षामधून दोनदा सामूहिकपणे पक्षांतर झाले. वास्तविक प्रमोद सावंत यांनी सरकार स्थापन केले ते अपक्षांच्या पाठिंब्यावर, त्यांना नंतर मगो पक्षानेही पाठिंबा दिला. पण बहुमत असतानाही दोनदा काँग्रेसचे आमदार भाजपात आले ते नेमके कशासाठी, ते शेवटपर्यंत कळलेच नाही. बहुमताची गरज होती, तर त्यांना फोडले गेले, आमीष दाखवले गेले, असे म्हणता आले असते. पण तसे काही नव्हते, याचाच अर्थ ही मंडळी आपल्या स्वार्थासाठी आली असे म्हणावे लागेल. बरे, जे लोक आले ते कोण याचा शोध लावला, तर आश्चर्यच वाटेल. कारण भाजपवर ज्या मुद्द्यांवरून आगपाखड केली जाते, त्याच वर्गातील म्हणजे अल्पसंख्य आमदार भाजपच्या गोटात आले. म.गो. पक्ष सरकारात सामील झाला, त्यामागील कारण अमित शहा व नंतर होणारी लोकसभा निवडणूक होती. अर्थात त्या निवडणुकीत मगो पक्षाचा भाजपला कोणताच लाभ दिसून आला नाही, ही गोष्ट वेगळी. आता या विधानसभा निवडणुकीत मगो पक्ष भाजपबरोबर राहतो की काय तेही लवकरच स्पष्ट होईल. पण ही निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतशी गोव्यात वेगळीच समीकरणे जुळून येऊ शकतात. त्यातून कोणाचे पाय किती खोलात गेले आहेत, तेही दिसून येईल.
गत निवडणुकीत जन्मास आलेल्या आरजी पक्षाबाबत लोकांच्या बऱ्याच अपेक्षा होत्या. त्यातूनच त्यांचा एक आमदारही निवडून आला, तर अनेक ठिकाणी त्या पक्षाने भरीव मते मिळविली होती. पण हल्ली त्या पक्षात जी काही बंडाळी झाली आहे, त्यातून तो पक्षही इतरांच्या रांगेत जाऊन बसला आहे. त्या पक्षातून मनोज परब नेमके का बाहेर पडले व आता का परतले आहेत, ते त्यांचे त्यांनाच माहीत. आता तर त्या पक्षाने एकमेव आमदार असलेल्या वीरेश बोरकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
गेल्या काही वर्षांत असे अनेक स्थानिक पक्ष निवडणुकीच्या काळात उदयास आले व नंतर लोप पावले आहेत. निवडणूक तोंडावर आली तरी भाजपविरोधी आघाडी साकारत नाही, हेही असेच एक उदाहरण आहे, यातून मतदारांनी काय निष्कर्ष काढावा, हाही प्रश्नच आहे.
मगो पक्षाच्या नेत्यांनी तर नाव न घेता भाजपला पक्षांतर केलेल्यांना उमेदवारी देऊ नये, असा सल्ला दिला आहे. एक प्रकारे ‘सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली’ यासारखा हा प्रकार आहे. कारण २०१२ वगळता कधीच मगो पक्षाने भाजपशी निवडणूकपूर्व युती केलेली नाही, पण भाजप सत्तेवर आल्यावर मगो पक्ष सरकारात सहभागी झाला व त्यानंतरच्या निवडणुकीत परत भाजपविरुद्ध उभा ठाकला. पक्षांतराचा किंवा त्याला प्रोत्साहन देणाऱ्यांची मगो पक्षाला इतकी किळस असती तर तो सत्तेत का सहभागी झाला, की सत्तेची उब त्याला बाहेर राहू देत नव्हती, असा प्रश्न त्यामुळे पडतो. २०१२ नंतर पर्रीकरांना नको नको ती दूषणे देणारेच २०१७ मध्ये त्यांना दिल्लीतून गोव्यात आणतात व सत्तेवर बसवतात, हे पाहिले तर काळाचा महिमा तो हाच का? असा प्रश्न पडतो. त्यामुळेच येत्या निवडणुकीच्या तोंडावर किंवा निवडणुकीनंतर अशी नवी समीकरणे तयार झाली, तर नवल वाटायला नको. वास्तविक युद्धात व प्रेमात कोणीच कोणाचा कायम मित्र वा शत्रू नसतो, असे म्हणतात. आता त्यात राजकारण्यांचाही समावेश करता येण्यासारखा आहे. गेल्या १०-१५ वर्षात गोव्यातील बहुतेक मतदारसंघांत राजकारण्यांनी ज्या उड्या विविध पक्षांमध्ये मारल्या आहेत त्या पाहिल्या, तर त्या उड्यांना काय संबोधावे असा प्रश्न पडावा. सासष्टीतीलच नव्हे, तर उत्तरेतील काही नेते तर नेमके कोणत्या पक्षात आहेत, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडावा. इतके सगळे होऊनही ही मंडळी पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यास सज्ज होताना दिसतात. त्यांची निवेदनेच ते दाखवून देतात. बरे, उद्या हे लोक पुन्हा निवडून येण्याची आणि सत्तेसाठी पुन्हा नव्या पक्षात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, नव्हे तर तीच शक्यता जास्त आहे. आजवरची त्यांची वाटचालच त्याची साक्ष देते. त्यामुळे आगामी निवडणूक ही एकप्रकारे मतदारांसाठी कसोटीच ठरणार आहे. पाच ते सहा वेळा निवडून आलेले पुन्हा रिंगणात उतरण्याचा मोह ज्या अर्थी आवरू शकत नाहीत, त्या अर्थी नव्यांना संधी कशी मिळणार? या प्रश्नाचेही उत्तर मिळत नाही. या सर्वांतून वाट काढण्याचे, ‘उडदामाजी काळे गोरे’ काय निवडावे यासारखे काम मतदारराजालाच करावे लागेल, हे मात्र नक्की.



