पणजी : राज्यात अमली पदार्थ तस्करीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) (Anti -Narcotic cell Goa ANC) मोठी कारवाई केली आहे. पर्वरी येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनीत मध्यरात्री छापा टाकून तब्बल १ कोटी ५ लाख २९ हजार रुपये किमतीचा १ किलो ५२.९ ग्रॅम संशयित हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सुरत (गुजरात) येथील ३१ वर्षीय रुचितकुमार वेकारिया याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे २३ आणि २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री एएनसी पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक विकेश हडफडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत संशयिताची झडती घेतली. यावेळी त्याच्या पांढऱ्या रंगाच्या हुंदाई आय-२० कारमध्ये लपवून ठेवलेले पारदर्शक प्लास्टिक पिशवीतील हिरवट पानांसह फुले व फळधारणा असलेले गांजासदृश पदार्थ आढळून आले. तपासणीत हा पदार्थ हायड्रोपोनिक गांजा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याचे वजन १,०५२.९ ग्रॅम इतके आहे.
या प्रकरणी एएनसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम २०(बी)(ii)(बी) अंतर्गत गुन्हा दाखल करून संशयिताला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अटक करण्यात आली.
पोलीस अधीक्षक हरीशचंद्र मडकईकर, उपअधीक्षक गौरव यादव आणि पोलीस निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास उपनिरीक्षक विकेश हडफडकर करीत आहेत.
जप्त केलेला अमली पदार्थ कुठून आणण्यात आला आणि या तस्करीमागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. गोव्याला अमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने तस्करीविरोधात कठोर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार एएनसी पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सखोल तपास करण्याची मागणी
पर्वरीसारख्या गजबजलेल्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात हायड्रोपोनिक गांजासारखा अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा कुठून आणण्यात आला. याप्रकरणात गुंतलेल्यांची पाळेमुळे खणून काढण्याची मागणी करण्यात येत आहे.


