आजोशीतील जमीन रूपांतराविरोधात आरजीपीच्या मनोज गटाचा मोर्चा!

वीरेशविरुद्ध मनोज परब यांच्यासह माजी आमदार सिल्वेरा, रामराव वाघ एकत्र; आजोशी येथे सादिक दोडामणी यांनी केलेल्या जमीन रूपांतराच्या विरोधात रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टीच्या (आरजीपी) मनोज परब गटाने आक्रमक (RGP Manoj Parab) पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात मनोज परब यांच्यासह सांत आंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, रामराव वाघ एकत्र आले.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
22 mins ago
आजोशीतील जमीन रूपांतराविरोधात आरजीपीच्या मनोज गटाचा मोर्चा!

पणजी : आजोशी येथे सादिक दोडामणी यांनी केलेल्या जमीन रूपांतराच्या विरोधात रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टीच्या (आरजीपी)  मनोज परब गटाने आक्रमक (RGP Manoj Parab) पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात मनोज परब यांच्यासह सांत आंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, रामराव वाघ एकत्र आले. त्यांनी  वीरेश बोरकरविरुद्ध दंड थोपटले आहेत.

आजोशी येथील जमीन रूपांतराच्या मुद्द्यावरून स्थानिकांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याची माहिती मनोज परब गटातर्फे देण्यात आली. या आंदोलनाच्या माध्यमातून जमीन रूपांतराच्या निर्णयाला विरोध दर्शवत संबंधित प्रकरणी प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली.

विषय राजकीयदृष्ट्याही तापणार

विधानसभा निवडणूक जवळ आली असताना आजोशीतील जमीन रुपांतरणाच्या मुद्द्यावर मनोज परब  यांच्यासह विविध नेते एकत्र आल्याने आजोशीतील जमीन रूपांतराचा विषय आता राजकीयदृष्ट्याही तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, रविवारी जाहीर सभा आयोजित करून आरजीपीत पुन्हा परतलेले मनोज परब यांनी आमदार वीरेश बोरकर यांच्यावर कठोर शब्दात टीकास्त्र सोडले होते. त्याचबरोबर आपणच त्यांना राजकारणात आणून घडवल्याचा दावा करीत आपणच त्यांना संपवणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मनोज परब गटाने आजोशी येथील जमीन रुपांतराविरुद्ध मोर्चा काढला.

आणि या मोर्च्यात सांत आंद्रे मतदारसंघाचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा तसेच समाज कार्यकर्ते रामराव वाघ ही वीरेश बोरकर यांच्याविरुद्ध एकत्र आल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे यापुढे सांत आंद्रे मतदारसंघातील राजकारण बरेच तापणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

दरम्यान, आज मंगळवारी आजोशी जमीन रुपांतरप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होती. नेमकी तीच वेळ पाहून मनोज परब गटाने वरील मोर्चा काढला. याप्रकरणी पुढील सुनावणीसाठी १ डिसेंबरला  होणार आहे.