उधळशे-साकोर्डा येथे स्कुटरची विजेच्या खांबाला धडक; एक युवती ठार, दुसरी गंभीर

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
just now
उधळशे-साकोर्डा येथे स्कुटरची विजेच्या खांबाला धडक; एक युवती ठार, दुसरी गंभीर

फोंडा : उधळशे-साकोर्डा येथे मंगळवारी रात्री स्कुटरची धडक वीज खांबाला बसून झालेल्या अपघातात निधी पाटील या युवतीचा मृत्यू तर रावी गावकर ही युवती गंभीर जखमी झाली आहे. कुळे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. अपघातात मृत झालेली निधी पाटील व जखमी झालेली रावी गावकर या दोन्ही हिराबाई तळावलीकर हायस्कूलमध्ये नववीत शिकत होत्या.

नववाडा-साकोर्डा येथील युवती स्कुटरवरून उधळशे येथील पुलाजवळ वडापाव खाण्यासाठी जात होत्या. मात्र, उधळशे येथे पोहचण्यापूर्वी एका वळणावर चालकाचे नियंत्रण गेल्याने स्कुटरची धडक वीज खांबाला बसली. यात दोन्ही युवती गंभीर जखमी झाल्या. जखमी युवतींना पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, आरोग्य केंद्रात डॉक्टरांनी तपासणी करून निधी पाटील हिला मृत घोषित केले. तर गंभीर जखमी झालेल्या रावी गावकर हिला अधिक उपचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले. कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक मेलविटो फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पंचनामा करण्यात आला.