बिसलेरीच्या गोव्यातील प्रकल्पासह सर्व १४३ प्रकल्प सुरूच

बिसलेरीच्या गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पात उत्पादित पाण्याच्या एका विशिष्ट बॅचच्या नमुन्याबाबत एफएसएसएआयने स्पष्टीकरण दिल्यानंतर कंपनीने त्याचे स्वागत केले आहे. कंपनीचे सर्व १४३ प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असून, ते एफएसएसएआयच्या नियमांचे पालन करत असल्याचा दावा बिसलेरीने अधिकृत निवेदनाद्वारे केला आहे.


just now
बिसलेरीच्या गोव्यातील प्रकल्पासह सर्व १४३ प्रकल्प सुरूच

गोवन वार्ता न्यूज डेस्क
मुंबई/पणजी
बिसलेरीच्या गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पात उत्पादित पाण्याच्या एका विशिष्ट बॅचच्या नमुन्याबाबत एफएसएसएआयने स्पष्टीकरण दिल्यानंतर कंपनीने त्याचे स्वागत केले आहे. कंपनीचे सर्व १४३ प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असून, ते एफएसएसएआयच्या नियमांचे पालन करत असल्याचा दावा बिसलेरीने अधिकृत निवेदनाद्वारे केला आहे.
बिसलेरीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, वेर्णा औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पात २७ सप्टेंबर २०२५ रोजी उत्पादित करण्यात आलेल्या ‘जीओ २७०’ या एका बॅचच्या नमुन्याबाबत एफएसएसएआयने स्पष्टीकरण मागितले होते. कंपनी दरवर्षी ५० हजारांहून अधिक बॅचचे उत्पादन करते. त्यामुळे एफएसएसएआयने घातलेली विक्रीबंदी केवळ या विशिष्ट बॅचपुरती मर्यादित आहे. या बॅचचा साठा सध्या बाजारात उपलब्ध नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
ब्रोमेट चाचणीत नमुने पात्र
संबंधित बॅचच्या नमुन्यांची फेरतपासणी केल्यानंतर त्यामध्ये ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा कमी असल्याचे एफएसएसएआयने २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट केले. त्यामुळे ब्रोमेटच्या निकषांबाबत संबंधित नमुने पात्र ठरल्याचे कंपनीने म्हटले आहे.
पीएएचबाबत चाचणी अहवालात तफावत
एकाच स्रोतामधून घेतलेल्या सहा नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. या सर्व नमुन्यांना मान्यता मिळाली होती. मात्र, त्यानंतर फेरतपासणीत सहापैकी एका नमुन्यात ‘जीओ २७०’ या बॅचमध्ये प्रति लिटर ०.१४४ मायक्रोग्रॅम पीएएच आढळल्याचे अहवालात नमूद आहे. त्याच बॅचमधील अन्य एक नमुना तपासणीच्या सर्व निकषांवर पात्र ठरला. अहवालांतील तफावत निदर्शनास आणून कंपनीने फेब्रुवारी २०२६ मध्ये पीएएचची फेरतपासणी करण्याची मागणी केली होती.
सर्व प्रकल्पांचे कामकाज सुरू
बिसलेरीचे सर्व १४३ प्रकल्प पूर्णपणे कार्यरत असून, ते अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता मानकांचे पालन करत आहेत. गोव्यातील प्रकल्पाचे कामकाज बंद करण्याचा आदेश दिलेला नाही. या प्रकल्पातील त्यानंतरच्या उत्पादनांचे नमुनेही एफएसएसएआयच्या मानकांनुसार पात्र ठरले आहेत. ग्राहकांनी अधिकृत आणि पडताळणी केलेल्या माहितीवर विश्वास ठेवावा. दिशाभूल करणाऱ्या खोट्या प्रचाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही बिसलेरीने दिला आहे.       

हेही वाचा
सर्व पहा