आसगाव आग दुर्घटनाप्रकरणी दुकान मालकाविरुद्ध गुन्हा नोंद

दोघांच्या मृत्यूनंतर हणजूण पोलिसांची कारवाई

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
24th November, 11:45 pm
आसगाव आग दुर्घटनाप्रकरणी दुकान मालकाविरुद्ध गुन्हा नोंद

म्हापसा : आसगाव येथील आग दुर्घटना प्रकरणी हणजूण पोलिसांनी मून बेरी दुकानाचे मालक राज शर्मा (रा. आसगाव व मूळ जयपूर राजस्थान) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेत चार कामगारांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

कोणतीही सरकारी परवानगी न घेता आणि अग्निसुरक्षेतेचे नियम धाब्यावर बसवून ज्वलनशील साहित्याचा साठा करून ठेवण्यात आला होता. यामुळे दुकानाला भीषण आग लागली. या आगीत चार कामगार होरपळून जखमी झाले, नंतर त्यातील दोघांचा मृत्यू झाला. निष्काळजीपणा आणि मानवी जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित मालकाविरुद्ध हा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, दि. १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वा. सुमारास ही दुर्घटना घडली होती. मून बेरी नावाच्या सुकलेल्या गवताच्या इंटिरिअर डेकोरच्या दुकानाला ही भीषण आग लागली होती. यात संजय मडगावकर (५९, रा. आसगाव), रत्नेश चव्हाण (१९, रा. मूळ उत्तरप्रदेश), सूरज चव्हाण (२५, रा. मूळ उत्तरप्रदेश) व संदेश सावंत (५४, रा. म्हापसा) हे चार कामगार होरपळून जखमी झाले होते. नंतर त्यातील रत्नेश व संजय या जखमींचे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचारादरम्यान निधन झाले होते.

हणजूण पोलिसांनी या संपूर्ण दुर्घटनेची गंभीर दखल घेतली. उपनिरीक्षक विराज नाईक यांच्या तक्रारीच्या आधारे संशयित दुकान मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम २८७, १२५(ब) व १०६(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साईश किनळेकर हे करत आहेत.

परवानगीविना दुकान होते सुरू

पोलीस चौकशीत हे दुकान कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता संशयित आरोपी राज शर्मा हा चालवत होता. या दुकानात मोठ्या प्रमाणावर अत्यंत ज्वलनशील सुके गवत व इतर साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. मात्र, तिथे आग विझवण्यासाठी किंवा आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कोणतीही सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आली नव्हती, असे आढळून आले. 

हेही वाचा
सर्व पहा