मडगाव : कुंकळ्ळी पोलिसांनी चार दिवसांत चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावून संशयित महिलेला अटक केली. पर्पेचुआ जॉन परेरा असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून, तिच्याकडून सुमारे एक लाख रुपये किमतीचे चोरीचे सोन्याचे दागिने, ८ हजार ८०० रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवसा-कुंकळ्ळी येथील रहिवासी जुडिथ डायस यांनी १९ नोव्हेंबर रोजी रात्री कुंकळ्ळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात महिलेने त्यांच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केला. चाकूचा धाक दाखवून त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन, कानातील झुमके व बांगड्या असा सुमारे एक लाख रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला. त्यानंतर फिर्यादीला स्वयंपाकघरात नेऊन जमिनीवर ढकलून संशयित महिलेने घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरातील शेजाऱ्यांकडे चौकशी आणि तांत्रिक पाळत ठेवल्यानंतर घटनेच्या दिवशी संशयित महिला भिवसा परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, मूळची वेळ्ळी येथील आणि सध्या कुंकळ्ळी येथे राहणाऱ्या पर्पेचुआ जॉन परेरा हिला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तिला अटक करण्यात आली.
पोलिसांनी केलेल्या जप्ती पंचनाम्यात तुटलेली सोन्याची चेन, सोन्याचे कानातील झुमके, दोन सोन्याच्या बांगड्या, ८ हजार ८०० रुपये रोख, गुन्ह्यावेळी परिधान केलेले कपडे आणि तपकिरी मूठ असलेला चाकू जप्त करण्यात आला.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत आयुष, मडगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीदेवी बी. व्ही. आणि कुंकळ्ळीचे पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली कुंकळ्ळी व फातोर्डा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


