फिरोजाबाद : पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या पतीने इंटरनेट कॅफेमध्ये पत्नी आणि तेथील एका तरुणावर परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे घडली. ‘पेहले तुं मरेगी’ म्हणत पतीने पत्नी प्रियकराचा पाठलाग करून गोळ्या झाडल्या. त्यामुळे परिसर हादरला. या थरारनाट्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. या घटनेत पत्नी शिप्रा आणि सनी ऊर्फ शिवा ठाकूर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी संशयित ऋषभ तैलंग याला अटक केली आहे.
कोटला चुंगी चौक परिसरातील एका इंटरनेट कॅफेमध्ये रात्री सुमारे १० वाजता हा प्रकार घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, शिप्रा कॅफेमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर ऋषभ तेथे पोहोचला. पत्नीचे सनीसोबत संबंध असल्याचा त्याला संशय होता. कॅफेमध्ये दोघांना एकत्र पाहिल्यानंतर त्याने कथितरीत्या परवानाधारक रिव्हॉल्व्हर काढून सहा गोळ्या झाडल्या. यातील चार गोळ्या शिप्राला, तर दोन गोळ्या सनीला लागल्या.
दोघांचीही प्रकृती गंभीर
गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दुकानदारांनी दुकाने बंद केली, तर नागरिकांनी घटनास्थळावरून धाव घेतली. जखमी दोघांना प्रथम जिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी आग्रा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले.
पापा हे करू नका.. मुलाची आर्त हाक
ऋषभ आणि शिप्रा यांचा सुमारे दहा वर्षांपूर्वी विवाह झाला असून त्यांना दोन मुले आहेत. दोघांमध्ये काही काळापासून वाद सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेवेळी त्यांचा मुलगाही तेथे उपस्थित होता. त्याने मोबाईलमध्ये घटनेचे चित्रीकरण केले असून, व्हिडिओमध्ये तो वडिलांना, ‘पापा नाही, पापा हे करू नका...’ अशी विनवणी करताना ऐकू येत आहे.
विवाहबाह्य संबंधांचा आरोप चुकीचा : शिप्रा
पोलिसांनी ऋषभला अटक करून त्याच्याकडून परवानाधारक रिव्हॉल्व्हर, काडतुसे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, समोर आलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये जखमी शिप्राने आपल्यावर विवाहबाह्य संबंधांचा आरोप चुकीचा असल्याचे सांगितले आहे. सनीला एका कटातून लक्ष्य करण्यात आल्याचा दावा केला आहे. फिरोजाबादचे एसएसपी आदित्य लांघे यांनी प्रकरणाचा तपास सुरू असून, त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे सांगितले.


