पणजी :येथील उत्पादन शुल्क मुख्यालयात स्वतःला नवीन आयुक्त सांगत कर्मचाऱ्यांवर हुकूम सोडणाऱ्या एका तोतया अधिकाऱ्याचा भांडाफोड कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे झाला आहे. दरम्यान, संबंधित तोतया अधिकाऱ्यालाच बनावट दस्तावेज आणि नियुक्तीचा आदेश देऊन २७ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांनी अजित शंखवाळकर या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
उत्पादन शुल्क खात्याचे साहाय्यक आयुक्त संकेत साखरदांडे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयित अजित शंखवाळकर याने मनोज तळेकर याला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देऊन त्याच्याकडून २७ लाख रुपये उकळले. त्यानंतर तळेकर याला उत्पादन शुल्क आयुक्त, अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त-१ आणि प्रशासन संचालक या पदांवर नियुक्ती केल्याचे बनावट आदेश दिले.
या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन मडगावकर यांनी संशयित अजित शंखवाळकर याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे, असे पणजी पोलिसांनी सांगितले.
तत्कालीन आयुक्त आश्विन चंद्रू (आयएएस) यांची आठ दिवसांपूर्वीच अरुणाचल प्रदेशात बदली झाल्यामुळे हे पद रिक्त होते आणि नवीन नियुक्तीची प्रक्रिया प्रलंबित होती. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत मनोज तळेकर याने आपण आयएएस अधिकारी तसेच आयुक्त असल्याचे सांगत थेट मुख्यालयात प्रवेश केला.
त्याने आयुक्तांच्या दालनाचा ताबा घेतला आणि स्वतःला नवीन आयुक्त घोषित करत सरकारी पाहुणचार उपभोगण्यास व कर्मचाऱ्यांवर हुकूम सोडण्यास सुरुवात केली.
बनावट स्वाक्षरीमुळे संशय
कर्मचाऱ्यांवर छाप पाडण्यासाठी त्याने माजी आयुक्तांची बनावट स्वाक्षरी असलेले एक नियुक्ती पत्रही सादर केले होते. त्यानंतर त्याने विविध फाईल्स मागवून आदेश जारी करण्यास सुरुवात केली. मात्र, अचानक झालेली ही नियुक्ती आणि त्याचा संशयास्पद वावर यामुळे कार्यालयातील उपस्थित अधिकाऱ्यांच्या मनात संशय निर्माण झाला.
माजी आयुक्तांच्या वैयक्तिक साहाय्यकांना संशय आल्याने त्यांनी कार्मिक खात्याकडे तसेच माजी आयुक्तांकडे विचारणा केली. त्यावेळी असा कोणताही नवीन आयुक्त नियुक्त करण्यात आला नसल्याचे स्पष्ट झाले.
आयुक्तांच्या खुर्चीतून संशयित ताब्यात
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आयुक्तांच्या खुर्चीत बसलेल्या त्या बनावट अधिकाऱ्याला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात त्याचे नियुक्ती पत्र आणि स्वाक्षरी पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यालाच २७ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी संशयित अजित शंखवाळकर याच्या विरोधात गुन्हा नोंदवून कारवाई सुरू करण्यात आली आहे, असे पणजी पोलिसांनी सांगितले.


