अबकारी खात्यात कमिशनर बनून आला बनावट आयएएस अधिकारी

पणजी येथील उत्पादन शुल्क मुख्यालयात स्वतःला नवीन आयुक्त सांगत कर्मचाऱ्यांना हुकूम सोडणाऱ्या एका तोतया अधिकाऱ्याला कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. वाचा, गोवा अबकारी आयुक्तालयातील धक्कादायक प्रकार!

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
08th October, 05:27 pm
अबकारी खात्यात कमिशनर बनून आला बनावट आयएएस अधिकारी

पणजी : येथील उत्पादन शुल्क विभागाच्या मुख्य कार्यालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आठ दिवसांपूर्वीच तत्कालीन आयुक्तांची बदली झाल्यामुळे हे पद रिक्त होते आणि नवीन नियुक्तीची प्रक्रिया प्रलंबित होती. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत एका व्यक्तीने आयएएस ऑफिसर असल्याचे सांगत आयुक्त या नात्याने थेट मुख्यालयात प्रवेश केला. यानंतर त्याने थेट आयुक्तांच्या केबिनचा ताबा घेतला. स्वतःला नवीन आयुक्त म्हणून घोषित करत सरकारी पाहुणचार घेतला तसेच, कर्मचाऱ्यांवर हुकूम चालवण्यास सुरुवात केली.

त्याने कर्मचाऱ्यांवर छाप पाडण्यासाठी पूर्व आयुक्तांची बनावट स्वाक्षरी असलेले एक नियुक्ती पत्रही सादर केले. त्यानंतर विविध फाईल्स मागवून आदेश जारी करण्यास सुरुवात केली. मात्र, अचानक झालेली ही नियुक्ती आणि त्याचा संशयास्पद वावर यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाली. त्यांनी तात्काळ वरिष्ठ पातळीवर आणि संबंधित विभागांशी संपर्क साधून खातरजमा केली असता, असा कोणताही नवीन आयुक्त नियुक्त केला गेला नसल्याचे स्पष्ट झाले.

भामटेगिरीचा भांडाफोड होताच कर्मचाऱ्यांनी न घाबरता अत्यंत हुशारीने पणजी पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि थेट आयुक्तांच्या खुर्चीत बसलेल्या त्या तोतया अधिकाऱ्याला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात त्याने दाखवलेले नियुक्ती पत्र आणि स्वाक्षरी पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून त्याला अटक केली आहे. या प्रकरणात त्याच्यासोबत काही साथीदार असण्याची शक्यता असल्याने पोलिसांचा त्या दृष्टीने तपास सुरू आहे. 

शासकीय इमारतीमध्ये घुसून थेट आयुक्तांच्या खुर्चीत बसण्याचे धाडस करणाऱ्या या भामट्याचा मुख्य हेतू काय होता, तो कोणत्या महत्त्वाच्या फाईल्स किंवा माहितीच्या शोधात होता, या दिशेने पणजी पोलीस सध्या सखोल तपास करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा प्रशासकीय आणि कायदेशीर घोटाळा टळला असून, या घटनेमुळे संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, सदर व्यक्तीचे वडील पोलीस खात्यात असून एकाने १.२५ कोटी रुपयांच्या बदल्यात बनावट नियुक्तीपत्र देऊन त्यांची फसवणूक केल्याचा दावा त्याने केला आहे. यादृष्टीने देखील तपास सुरू आहे. 


हेही वाचा
सर्व पहा