पणजी: लता मंगेशकर, आशा भोसले दाक्षिणात्य गायिका जानकी अम्मा यांची गाणी ऐकत मी मोठी झाले. माझ्या गायनावर त्यांच्या व समकालीन अन्य गायकांचा प्रभाव आहे. लता दीदींची गाणी आजही ऐकली तरी मी भावनात्मक होते. त्यांच्या गाण्याप्रमाणे माझ्या मनात प्रेम, निराशा अशा भावना निर्माण होतात. मी लता दीदींची सर्वात अधिक भक्ती संगीताची, मीरा भजनाची गाणी ऐकते असे प्रतिपादन प्रख्यात दाक्षिणात्य गायिका के. एस. चित्रा यांनी केले.
बुधवारी इफ्फीच्या लता मंगेशकर स्मृती व्याख्यानात त्या बोलत होत्या. यावेळी अभिनेत्री सुहासिनी मणिरत्नम यांनी त्यांच्याशी संवाद साधला. चित्रा म्हणाल्या की, लता दीदी चित्रपट सृष्टीत सर्वस्व होत्या.त्या राजाही होत्या आणि राणीही होत्या. त्या काळात अनेक अभिनेत्री आणि अनेक चित्रपट पूर्णपणे लताजींवर अवलंबून असायचे. एखादे गाणे रेकॉर्ड करायचे असेल, तर त्यांना फक्त लताजीच हव्या असायच्या. जर त्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपलब्ध नसेल, तर चित्रपटाचे काम तिथेच थांबायचे. परिस्थिती अशी होती.
मी त्यांच्याबाबत अशा अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. प्रत्येक चित्रपटात अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्माते ,सर्वांची एकच इच्छा असायची की, गाणे फक्त लताजींनीच गायले पाहिजे. काही विशिष्ट गाणी आणि काही रचना खास लताजींसाठीच तयार केल्या होत्या. आपल्या गायन क्षेत्राच्या प्रवासाबद्दल चित्रा यांनी सांगितले की, माझ्या कुटुंबात पहिल्यापासूनच संगीत होते. माझे वडील आकाशवाणी मध्ये गायन करत होते.
शालेय जीवनात संगीत स्पर्धांमध्ये मला अनेक पारितोषिके मिळाली. यानंतर मी शास्त्रीय संगीत शिकले. मला चित्रपट सृष्टीत यायचे नव्हते. शास्त्रीय संगीताचा अभ्यासक्रम पूर्ण करून संगीत शिक्षक व्हायची माझी इच्छा होती. मात्र मला चित्रपट क्षेत्रातच गायन करण्याची संधी मिळत गेली. नंतर मी याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. या क्षेत्रात सुरुवातीच्या काळात काही अडचणी होत्या. मात्र येशूदासजिंसोबत मिळालेल्या गाण्याच्या संधीमुळे माझे नाव झाले.
स्टुडिओत पोहोचल्यावरच गाण्याचे शब्द मिळायचे
चित्रा यांनी सांगितले की, तो काळ वेगळा होता. मी गायिका जरी असले तरी आज मी कोणते गाणे गाणार आहे हे माहीत नसायचे. स्टुडिओत पोहोचल्यावरच मला गाण्याचे शब्द मिळायचे. आणि आम्ही त्याचे संगीत शिकून मग गाणे गात होतो.


