मडगाव : मुख्य रस्त्यालगत असलेल्या श्री बोर्डेश्वर मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास फोडून त्यातील रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. दरम्यान, मुख्य रस्त्यावर रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री ३ ते ३.१० च्या दरम्यान चोरट्यांनी मंदिराची दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरली. त्यानंतर शेजारील अन्य एका धार्मिक स्थळाची दानपेटी फोडण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. यासाठी चोरट्यांनी परिसरातील दिवे बंद केले होते. मात्र, तेथील एका कर्मचाऱ्याला संशय आल्याने त्याने पाहणी केली. कर्मचारी येत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी पळ काढला. कर्मचाऱ्याने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले.
पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मंदिराचे पुजारी नित्यपूजेसाठी आले असता दानपेटी फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सकाळी ५.३० वाजता पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी परिसरातील दुकाने आणि हॉटेल्समधील सीसीटीव्ही चित्रण तपासले असता, दोन चोरटे दुचाकीवरून आल्याचे दिसून आले आहे. दोघांनीही चेहऱ्यावर मुखवटे घातल्याने त्यांची ओळख पटू शकलेली नाही. सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
मुख्य रस्त्यावर पूर्वी पोलिसांकडून नियमित रात्रीची गस्त घातली जात होती. त्यामुळे अशा चोरीच्या घटना टाळण्यास मदत होत होती. मात्र, आता भररस्त्यावर चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त पुन्हा सुरू करून किमान दोन पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी माजी नगरसेवक कामिल बार्रेटो यांच्यासह नागरिकांनी केली आहे.


