कोकण रेल्वेत विनाकारण साखळी ओढल्याप्रकरणी २२६ जणांवर गुन्हे दाखल

वक्तशीरपणाला बाधा आणणाऱ्यांवर कारवाई; रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक अबाधित राखण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या कृत्यांना आळा घालण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
18 mins ago
कोकण रेल्वेत विनाकारण साखळी ओढल्याप्रकरणी २२६ जणांवर गुन्हे दाखल

मडगाव : रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक अबाधित राखण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या कृत्यांना आळा घालण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने (Konkan Railway Corporation Limited KRCL) विशेष मोहीम हाती घेतली आहे. विनाकारण अलार्म चेन ओढणे, रेल्वे रुळांवर अनधिकृत प्रवेश करणे तसेच रुळांवर दगड किंवा अन्य वस्तू ठेवून रेल्वे वाहतुकीत अडथळे निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे.

रेल्वे गाड्यांमधील ‘अलार्म चेन’ची सुविधा केवळ आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी आहे. विनाकारण साखळी ओढणे हा रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४१ अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

  विनाकारण साखळी ओढल्यामुळे गाड्या मध्येच थांबतात आणि रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. परिणामी हजारो प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. १ एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत विनाकारण ‘अलार्म चेन’ ओढल्याची २२६ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. या प्रकरणांतील संबंधितांना अटक करून कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

रेल्वे रुळांवरून अनधिकृतपणे चालणे किंवा रेल्वे परिसरात अतिक्रमण करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम १४७ नुसार गुन्हा आहे. अशा प्रकारांसाठी ५०० रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच रेल्वे रुळांवर दगड, कचरा किंवा अन्य वस्तू ठेवणे हा गंभीर प्रकार असून, त्यामुळे रेल्वे वाहतूक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो.

अशा बेकायदेशीर कृत्यांवर कोकण रेल्वे प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे. प्रवाशांनी आणि नागरिकांनी रेल्वे सेवेत अडथळा आणणाऱ्या कृत्यांपासून दूर राहावे आणि सुरक्षित व वक्तशीर रेल्वे सेवेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे. रेल्वे रुळांवर किंवा परिसरात संशयास्पद हालचाल अथवा अडथळा आढळल्यास त्याची त्वरित रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असेही प्रशासनाने सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा