पणजी : राज्य सरकारने बांधकाम नियमांत महत्त्वपूर्ण बदल करताना अतिरिक्त एफएआर (फ्लोअर एरिया रेशो) आणि इमारतींची उंची वाढविण्यासाठी तरतूद केली आहे. या बदलामुळे ठरावीक आकाराच्या भूखंडांवर अधिक बांधकाम क्षेत्राचा वापर करता येणार असून, काही प्रकरणांत इमारतींची उंची तब्बल ४० मीटरपर्यंत वाढविण्याची मुभा मिळणार आहे.
नव्या तरतुदीनुसार, ३०० चौ.मी. किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांवर अतिरिक्त एफएआर आणि वाढीव उंची मंजूर करता येणार आहे. त्यामुळे शहरी तसेच विकसित भागांमध्ये उपलब्ध भूखंडाचा अधिक परिणामकारक वापर करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
रस्त्याची रुंदी आणि भूखंडाच्या आकारमानानुसार अतिरिक्त एफएआर ४० ते १५० पर्यंत मंजूर केला जाऊ शकतो. त्यामुळे मोठ्या भूखंडांसह योग्य रुंदीच्या रस्त्यालगत असलेल्या बांधकामांना अतिरिक्त बांधकाम क्षेत्राचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नव्या नियमांनुसार इमारतींची कमाल उंची ४० मीटरपर्यंत राहू शकते. या बदलामुळे गोव्यातील बांधकाम क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः मोठ्या भूखंडांवरील विकासकामांचे स्वरूप बदलणार आहे.
या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रासाठी अधिक संधी निर्माण होत असल्या तरी वाढत्या बांधकामासोबत वाहतूक, पायाभूत सुविधा, पार्किंग आणि पर्यावरणीय बाबींचे नियोजनही महत्त्वाचे ठरणार आहे.


