कोकण रेल्वे मार्गावर तिकीट तपासणी मोहीम तीव्र

विनातिकीट व अनियमित प्रवासाची २.६२ लाख प्रकरणे उघड; १७.३१ कोटींचा महसूल वसूल

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
कोकण रेल्वे मार्गावर तिकीट तपासणी मोहीम तीव्र

मडगाव : विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने संपूर्ण मार्गावर विशेष तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत रेल्वेने ६,३१६ विशेष तपासणी मोहिमा राबवून विनातिकीट व अनियमित प्रवासाची २,६२,९३७ प्रकरणे उघडकीस आणली. या प्रकरणांतून रेल्वे भाडे आणि दंडा पोटी १७.३१ कोटी रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला. केवळ ऑक्टोबर महिन्यात नियमित तपासणीसोबत ८९० विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमांमध्ये अनियमित प्रवासाची २९,५३६ प्रकरणे आढळली. संबंधित प्रवाशांकडून थकीत रेल्वे भाडे आणि दंडापोटी २.१५ कोटी रुपये वसूल करण्यात आले.

 अधिकृत तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि आरामदायी व्हावा, तसेच विनातिकीट प्रवासामुळे होणारे नुकसान रोखावे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. आगामी नाताळच्या सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणी आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

या काळात अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकांकडून संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर कडक तपासणी केली जाणार आहे. प्रवासादरम्यान होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व प्रवाशांनी वैध तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा
सर्व पहा