गोव्यातील ४ मित्रांनी ३ दिवसांत सर केला हिमालयातील रुपीन पास

कामगिरीची ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडून दखल; गोव्यातील चार मित्रांनी आव्हानात्मक मानला जाणारा हिमालयातील रुपिन पास (Rupin Pass) यशस्वीपणे सर केला. ६५ कि. मीटरचा प्रवास अवघ्या तीन दिवसांत पूर्ण केला. (Goas four friends conquer rupin pass himalayas three days).

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
36 mins ago
गोव्यातील ४ मित्रांनी ३ दिवसांत सर केला हिमालयातील रुपीन पास

पणजी : गोव्यातील चार मित्रांनी आव्हानात्मक मानला जाणारा हिमालयातील  रुपिन पास (Rupin Pass) यशस्वीपणे सर केला. ६५ कि. मीटरचा प्रवास अवघ्या तीन दिवसांत पूर्ण केला. (Goas four friends conquer rupin pass himalayas three days).  त्यांच्या या साहसी कामगिरीची ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने दखल घेतली आहे. त्यासंबंधीचे प्रमाणपत्र लवकरच जारी होणार आहे. विकास कुलकर्णी, देवेंद्र गुरव, संज्योत नाईक आणि अखिलेश सावंत या चौघांनी जिस्कुन ते सांगला हा सुमारे ६५ किलोमीटरचा खडतर प्रवास अवघ्या तीन दिवसांत पूर्ण केल्याची माहिती दिली. 


यासंदर्भात माहिती देताना देवेंद्र गुरव यांनी सांगितले की, हिमालयातील बर्फाच्छादित पर्वतरांगा, खोल दऱ्या, अंगावर काटा आणणारे बर्फाचे वादळ, उणे १२ अंश सेल्सिअस तापमान आणि तब्बल ७० अंशांचा खडा चढ… अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आव्हानात्मक मानला जाणारा रुपिन पास (Rupin Pass) यशस्वीपणे सर केला. 


देवेंद्र गुरव यांनी पुढे सांगितले की, हिमाचल प्रदेशातील उंच पर्वतरांगांमध्ये वसलेला रुपिन पास हा हिमालयातील सर्वाधिक सुंदर आणि आव्हानात्मक ट्रेकपैकी एक मानला जातो. घनदाट जंगले, खोल दऱ्या, बर्फाच्छादित शिखरे, विशाल धबधबे आणि अत्यंत अवघड चढण यामुळे साहसी भटकंती करणाऱ्यांसाठी ही एक मोठी परीक्षा असते. मात्र, आम्ही ही खिंड सर केली नाही, तर नेहमीच्या सात दिवसांच्या ट्रेकचा टप्पा तीन दिवसांत पूर्ण केला. 


देवेंद्र गुरव यांनी मोहीमेविषयी माहिती देताना सांगितले की,  एका सहज भेटीत भटकंतीच्या गप्पा रंगल्या आणि हिमालयाच्या आठवणींना उजाळा मिळाला. त्याच वेळी कुणीतरी सहज प्रश्न विचारला, ‘रुपिन पास करूया का?’ या एका प्रश्नातून मोहिमेचा बेत आखला गेला. ट्रेकची तारीख १२ ऑक्टोबर निश्चित झाली. नकाशावर गावे, मुक्काम आणि मार्ग ठरवताना उत्साह वाढत होता. मात्र, पुढे याच मार्गावर बर्फाच्या वादळाचा सामना करावा लागेल, याची कल्पना तेव्हा कोणालाच नव्हती.


सात दिवसांचा ट्रेक तीन दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान

रुपिन पासचा नेहमीचा ट्रेक साधारण सात दिवसांचा असतो. शिमल्याहून जिस्कुन, पुढे जाखा, धांदेरास थाच, अप्पर वॉटरफॉल, रुपिन पास, रोंटी गाड आणि त्यानंतर सांगला असा या मोहिमेचा मार्ग आहे.


मात्र, आम्ही जिस्कुन ते सांगला हा प्रवास सलग तीन दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन केले होते.

मोहिमेच्या काही दिवस आधीच हवामानाने अडथळे निर्माण केले. ३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान उंच पर्वतीय भागात अवेळी जोरदार हिमवृष्टी झाल्याची माहिती मिळाली.

त्यामुळे पुढील मार्ग बर्फाखाली गेला असेल का, खिंड पार करता येईल का, असे प्रश्न निर्माण झाले.


तरीही जिद्द कायम ठेवत शिमल्याहून जिस्कुन गाठले आणि प्रत्यक्ष पायपिटीला सुरुवात केली. आणि अनेक अडथळ्यांचा सामना करीत शेवटी ध्येय गाठल्याचे देवेंद्र गुरव यांनी सांगितले. 


हेही वाचा
सर्व पहा