पणजी: कला आणि संस्कृती खाते, गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी), विठ्ठलापूर-साखळी येथील दीपावली उत्सव समिती आणि श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव आणि नौका शर्यतीला मंगळवारी रात्री उशिरा सुरुवात झाली. साखळीच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचे दर्शन घडवणाऱ्या या उत्सवाने परिसरात नवा उत्साह निर्माण केला आहे.

मंगळवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास दिंडीसह श्रीकृष्णाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. विठ्ठलापूर गावाला प्रदक्षिणा घालून ही मिरवणूक वालवंटी नदीच्या तीरावर पोहोचली. नदीपात्राच्या मध्यभागी श्रीकृष्णाची मूर्ती विराजमान झाल्यानंतर महिलांनी दीपपूजन आणि दीपोत्सवाचा विधी पार पाडला. नदीच्या शांत पाण्यात तेवणारे दिवे आणि भक्तीभावाचे वातावरण यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला.

रात्री ८ वाजल्यापासून नौका शर्यतीत सहभागी होणाऱ्या होड्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर संकुलाजवळ दाखल झाल्या. या होड्या पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. मंदिराशेजारी उभारण्यात आलेल्या विशेष मंचावर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यास रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

गोव्याच्या ग्रामीण भागातील सण-उत्सव केवळ धार्मिक विधींपुरते मर्यादित न राहता त्यातून सामाजिक एकोपा, सामूहिक सहभाग आणि स्थानिक कलाकौशल्य जपले जाते. साखळीतील त्रिपुरारी पौर्णिमेचा हा सोहळा त्याचेच जिवंत उदाहरण ठरला असून, पारंपरिक उत्सवांना आधुनिक पर्यटनाची आणि पर्यावरणाभिमुखतेची जोड कशी देता येते, हे या माध्यमातून पाहायला मिळाले.

मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलेले लोकपरंपरा आणि त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीतील विठ्ठलापूर येथील त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवात सहभागी होत या सोहळ्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मते, हा उत्सव गोव्याचा सांस्कृतिक वारसा, सर्जनशीलता आणि सामुदायिक भावना यांचा संगम घडवून आणतो. देव दिवाळीचे दिवे केवळ न पेटवता ते साखळीतील नागरिकांनी कागद आणि पुठ्ठ्यापासून तयार केलेल्या कलात्मक होड्यांवर ठेवून वाळवंटी नदीत सोडले जातात.

यातून साखळीकरांची कल्पकता, समर्पण आणि कलागुण दिसून येतात. पारंपरिक रूढी-परंपरा जपताना शाश्वत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा केल्याबद्दल त्यांनी श्री विठ्ठल-रखुमाई संस्थान आणि साखळीवासीयांचे कौतुक केले. संस्कृती, हस्तकला आणि स्थानिक समुदाय यांच्या माध्यमातून अनोखे अनुभव देणारी हीच 'गोवा बियाँड बीचेस'ची खरी भावना असल्याचे सांगत त्यांनी श्री विठ्ठल-रखुमाई चरणी साखळीच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.


