मित्रांना दाखवण्यासाठी रिव्हॉल्वर शाळेत आणले; चुकून गोळ्या सुटून विद्यार्थी जखमी

केरळच्या शिक्षणमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश; मित्रांना रिव्हॉल्वर दाखवण्याच्या कुतूहला पोटी एका नववीच्या विद्यार्थ्याने चक्क आपल्या आजोबांचे रिव्हॉल्वर शाळेत आणले. मात्र, वर्गात मित्रांना दाखवत असताना अचानक त्यातून दोन गोळ्या सुटल्या. यातील एक गोळी भिंतीला लागली, तर दुसरी गोळी त्याच्याच एका सहाध्यायाला लागल्याने तो जखमी झाला.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
45 mins ago
मित्रांना दाखवण्यासाठी रिव्हॉल्वर शाळेत आणले; चुकून गोळ्या सुटून विद्यार्थी जखमी

पलक्कड : मित्रांना रिव्हॉल्वर दाखवण्याच्या कुतूहला पोटी एका नववीच्या विद्यार्थ्याने चक्क आपल्या आजोबांचे रिव्हॉल्वर शाळेत आणले. मात्र, वर्गात मित्रांना  दाखवत असताना अचानक त्यातून दोन गोळ्या सुटल्या. यातील एक गोळी भिंतीला लागली, तर दुसरी गोळी त्याच्याच एका सहाध्यायाला लागल्याने तो जखमी झाला. (Revolver brought to school to show friends student injured by accidental shots). केरळमधील पलक्कड जिल्ह्यात मंगळवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पट्टांबी येथील कोडुमुंडा परिसरातील पारुदुर उच्च माध्यमिक शाळेत ही घटना घडली. संबंधित विद्यार्थी नववीच्या वर्गात शिकत असून, त्याने आपल्या दिवंगत आजोबांचे रिव्हॉल्वर आईला कोणतीही कल्पना न देता शाळेच्या बॅगेतून वर्गात आणले होते. केवळ कुतूहला पोटी आणि मित्रांना दाखवण्यासाठी त्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

वर्गात दोन वेळा गोळीबार; सहाध्यायी जखमी

मंगळवारी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास विद्यार्थी आपल्या मित्रांना रिव्हॉल्वर दाखवत होता. याच वेळी अचानक त्यातून दोन गोळ्या सुटल्या. पहिली गोळी वर्गाच्या भिंतीला लागली, तर दुसरी गोळी एका विद्यार्थ्याला लागली. गोळीबाराचा आवाज ऐकताच वर्गात आणि शाळेच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. जखमी विद्यार्थ्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वडिलांचे महिनाभरापूर्वी निधन

या घटनेच्या तपासादरम्यान आणखी एक बाब समोर आली आहे. संबंधित विद्यार्थ्याच्या वडिलांचेही सुमारे महिनाभरापूर्वी निधन झाले होते. त्याचे आजोबा हयात नसल्याने घरात ठेवलेल्या रिव्हॉल्वरकडे कोणाचेही लक्ष गेले नव्हते. याचाच फायदा घेत विद्यार्थ्याने आईला न सांगता रिव्हॉल्वर शाळेत आणल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे.

रिव्हॉल्वर जप्त; वर्ग खोली सील

या घटनेची केरळ सरकारने गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे शिक्षणमंत्री एन. शमसुद्दीन यांनी प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश शिक्षण संचालकांना दिले आहेत. दरम्यान, त्रितला पोलीस ठाण्याचे सब-इन्स्पेक्टर सत्यजीत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संबंधित रिव्हॉल्वर जप्त केले आहे. त्याच्या परवान्याची आणि कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली आहे. संबंधित वर्ग खोली सील करण्यात आली आहे.

शोरनूरचे डीएसपी के. सी. वीनू यांच्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे जबाब नोंदवले आहेत. रिव्हॉल्वर शाळेत कसे आणले गेले, त्यातून गोळ्या कशा सुटल्या आणि शस्त्राच्या परवान्याबाबतची वस्तुस्थिती काय आहे, याचा सविस्तर तपास सुरू आहे.

शाळेच्या वर्गखोलीतच घडलेल्या या घटनेने पालक आणि शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. घरातील बंदुका आणि अन्य शस्त्रे मुलांच्या हाताला लागणार नाहीत, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित केली आहे.

हेही वाचा
सर्व पहा