मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा : काँग्रेस

मतदारांच्या विशेष सखोल फेरतपासणीद्वारे (एसआयआर) अनेक बेकायदेशीर गोष्टी करण्यात आल्या आहेत. याला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणे आवश्यक आहे. त्यांच्यावर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
08th October, 01:55 pm
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा : काँग्रेस

पणजी:  मतदारांच्या विशेष सखोल फेरतपासणीद्वारे  (एसआयआर) अनेक बेकायदेशीर गोष्टी करण्यात आल्या आहेत. याला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणे आवश्यक आहे. त्यांच्यावर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली.

गुरुवारी राहुल गांधी यांच्या अटकेविरुद्ध आयोजित करण्यात आलेल्या मोर्चामध्ये ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार विरियातो फर्नांडिस व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले की, आमचे नेते राहुल गांधी यांनी एसआयआर प्रक्रियेमध्ये बेकायदेशीर गोष्टी चालत असल्याचे या आधीच सांगितले होते. आता या प्रक्रियेत अनियमितता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत अन्य दोन निवडणूक आयुक्तांनी आक्षेप घेतले होते. मात्र ज्ञानेश कुमार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

आज केवळ भाजपाला फायदा मिळवून देण्यासाठी एसआयआरचा वापर होत आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्ली येथे राहुल गांधी यांनी आंदोलन केले. आंदोलन शांततापूर्ण असले तरी दिल्ली पोलिसांनी त्यांच्यासह अन्य खासदारांना ताब्यात घेतले. महिला खासदारांसोबत चुकीची वागणूक दिली. या घटनेचा आम्ही निषेध करतो.

खासदार फर्नांडिस म्हणाले की, ज्ञानेश कुमार केरळमध्ये पीडब्ल्यूडी खात्याचे सचिव होते. त्यावेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. मोदी, शहा यांनी हे वीस वर्षापूर्वीचे प्रकरण पुन्हा बाहेर काढण्याची धमकी देऊन ज्ञानेश कुमार यांच्याकडून आपल्याला पाहिजे ते काम करून घेतले आहे.

हे प्रकरण बाहेर येणार याला घाबरून ज्ञानेश कुमार मत चोरीमध्ये भाजपची मदत करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. मोदी आणि शहा देशाला बुडवत आहेत. असे असले तरी भाजपच्या मत चोरी विरोधात आमचा लढा यापुढेही असाच सुरू राहणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा