‘नाम फाउंडेशन’द्वारे दुष्काळाच्या मातीत आशेची पालवी फुलवणारे नाना पाटेकर हरपले!

शहीद जवानांच्या कुटुंबीयांनाही मदतीचा हात; महान अभिनेते नाना पाटेकर यांचे आज (गुरुवारी) पहाटे गोव्यात दोनापावला येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नाना आपली इहलोकाची यात्रा संपवून परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. भारतीय अभिनय क्षेत्रातील एक उतुंग पर्व संपले. एक उत्कृष्ट अभ‌िनेता म्हणून जशी त्यांची जनमानसात ओळखी होती; तशीच एक सह्रदयी, कठीण प्रसंगी धावून जाणारे म्हणून नाना सर्वपरिचीत होते. दुष्काळ, पाणीटंचाई, कर्जबाजारीपणा आणि शेतकरी आत्महत्यांच्या संकटाने महाराष्ट्रातील ग्रामीण भाग होरपळत असताना, मदतीचा हात पुढे करणाऱ्या संस्थांमध्ये नाना पाटेकर यांच्या ‘नाम फाउंडेशन’ने वेगळी ओळख निर्माण केली होती. नाना आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी २०१५ मध्ये मध्ये सुरू केलेल्या या संस्थेने केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता गावांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला. आणि प्रत्यक्षात उतरवून दाखवला. आजही ‘नाम फाउंडेशन’चे काम त्याच जोमाने सुरू आहे. अनेकांच्या जीवनात आशेची किरणे फुलवत, जगण्याची नवी उर्मी देत.

Story: भास्कर देसाई।गोवन वार्ता |
08th October, 11:07 am
‘नाम फाउंडेशन’द्वारे दुष्काळाच्या मातीत आशेची पालवी फुलवणारे नाना पाटेकर हरपले!

पणजी : महान अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar)  यांचे आज (गुरुवारी) पहाटे गोव्यात (Goa)  दोनापावला येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नाना आपली इहलोकाची यात्रा संपवून परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. भारतीय अभिनय क्षेत्रातील एक उतुंग पर्व संपले. एक उत्कृष्ट अभ‌िनेता म्हणून जशी त्यांची जनमानसात ओळखी होती; तशीच एक सह्रदयी, कठीण प्रसंगी धावून जाणारे म्हणून नाना सर्वपरिचीत होते. दुष्काळ, पाणीटंचाई, कर्जबाजारीपणा आणि शेतकरी आत्महत्यांच्या संकटाने महाराष्ट्रातील ग्रामीण भाग होरपळत असताना, मदतीचा हात पुढे करणाऱ्या संस्थांमध्ये नाना पाटेकर यांच्या  ‘नाम फाउंडेशन’ने (Naam Foundation) वेगळी ओळख निर्माण केली होती. नाना आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी २०१५ मध्ये मध्ये सुरू केलेल्या या संस्थेने केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता गावांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला. आणि प्रत्यक्षात उतरवून दाखवला. आजही ‘नाम फाउंडेशन’चे काम त्याच जोमाने सुरू  आहे. अनेकांच्या जीवनात आशेची किरणे फुलवत, जगण्याची नवी उर्मी देत.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देण्यापासून या कार्याची सुरुवात झाली. संकटात सापडलेल्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण थांबू नये, यासाठी त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च उचलण्याचे कामही फाउंडेशनकडून केले जाते. त्यामुळे मदतीचा हात केवळ एका कुटुंबापुरता न राहता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतो.

पाण्यासाठी गावागावांत श्रमदान

दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारणावर विशेष भर देण्यात आला. मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये पाणी साठवणे, पाणी जमिनीत मुरवणे, नदी-नाल्यांमधील गाळ काढणे आणि जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन अशा विविध कामांना चालना देण्यात आली. साठवलेल्या पाण्याचा योग्य वापर आणि भूगर्भातील पाण्याचा समतोल राखण्यावरही भर देण्यात आला.

गावांच्या स्वयंपूर्णतेचा ध्यास

काही गावे दत्तक घेऊन तेथील पाणीप्रश्न सोडवण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. धोंडळगाव, गोगलगाव, कुतूबखेडे, कौदार आणि आमोला यांसारख्या गावांमध्ये विविध विकासकामांना हातभार लावण्यात आला. शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन, आरोग्यविषयक मदत आणि जीवनमान सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.

शहीद जवानांच्या कुटुंबीयांनाही मदतीचा हात

देशाच्या सीमेवर प्राणाची बाजी लावणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांनाही ‘नाम फाउंडेशन’ने मदतीचा हात दिला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदनेला केवळ सहानुभूती न देता त्यावर प्रत्यक्ष काम करण्याचा प्रयत्न म्हणजे ‘नाम फाउंडेशन’. ‘देशाला अन्न देणाऱ्या हातांना मदत’ या भावनेतून नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी सुरू केलेली ही चळवळ आजही ग्रामीण महाराष्ट्रासाठी आशेचा किरण ठरत आहे.

असे  सुरू झाले ‘नाम फाउंडेशन’ : नाना पाटेकर

‘नाम फाउंडेशन’ कसे सुरू झाले यासंदर्भात नाना पाटेकर यांनी सांगितलेली ही माहिती त्यांच्या परोपकारी, हळवे मन आणि दुसऱ्यांना मदतीचा हात देण्याचा स्वभाव अधोरेखित करते. कार खरेदी करण्यासाठी आपण दीड कोटी रुपये ठेवले होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या व एकूण व्यथा ऐकून आपण आपले मित्र मकरंद अनासपुरे यांना फोन केला. आणि जिल्हाधिकाऱ्यांना सोबत घेऊन दीड कोटी रुपयांमधील १५, १५ हजार रुपयांचे धनादेश आत्महत्याग्रस्तांना देण्यास सांगितले. मात्र, त्यांनी आपल्याला धनादेश देण्यासाठी बोलावले. १५ हजारांची मदत देण्यासाठी जाण्याची आपली तयारी नव्हती. मात्र, त्यांच्या आग्रहासाठी आपण तेथे गेलो. पाहिले तर २२० तरुण महिला (१७ ते २७ वर्षांच्या) लहान मुलांना घेऊन बसलेल्या आहेत. ते दृष्य पाहून आपले मन हेलावले. आणि समजून चुकले की ही समस्या मोठी आहे. १५ हजार देेऊन ते होणार नाही. त्यातूनच ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना झाली आणि केवळ दोन महिन्यांत ६० कोटी रुपये जमा झाले.

‘मरावे परी किर्ती रुपे उरावे’

आजही ‘नाम फाउंडेशनचे काम मोठ्या जोमात सुरू आहे. अनेकांना मदतीचा हात देत, त्यांच्या जीवनात संकटांवर मात करण्याची उर्मी जागवत, दुष्काळाच्या मातीत आशेची पालवी फुलवत निरंतर कार्यरत आहे. ‘नाम फाउंडेशन’चा पाया घालणारे, मानवी चेहरा जपणारे नाना पाटेकर आज अचानक आमच्यातून निघून गेले आहेत. मात्र, ‘नाम’ रुपाने आणि केलेल्या चांगल्या कार्याने कायम स्मरणात राहतील. ‘मरावे परी किर्ती रुपे उरावे’ असेच हे एकूण कार्य आहे. या कर्म योग्याला माझा अखेरचा दंडवत!



हेही वाचा
सर्व पहा