वास्को : गोव्याचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी, लोकशाही अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आणि राज्याला उज्ज्वल भविष्य मिळवून देण्यासाठी जनतेने काँग्रेसला पाठिंबा द्यावा, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी गुरुवारी केले.
‘गोवा राखण यात्रे’च्या १७व्या दिवशी कुठ्ठाळी येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिवकुमार म्हणाले, गोवा आणि गोमंतकीय जनतेविषयी माझ्या मनात विशेष प्रेम आहे. त्यामुळेच मी मोठ्या विश्वासाने येथे आलो आहे. २०२७ हे निवडणुकीचे वर्ष आहे. काँग्रेसचा इतिहास हा भारताच्या विकासाचा इतिहास आहे. काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे. जनतेच्या सुख-दुःखात काँग्रेस सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहते. त्यामुळे आपल्या लोकशाही अधिकारांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा द्या.
ते पुढे म्हणाले, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मी सदैव तुमच्या पाठीशी उभे राहू आणि तुमचे हात बळकट करू. आमचे गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव गोव्यात काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी संघर्ष करीत आहेत. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे मी गोमंतकीय जनतेला आवाहन करतो.
गोव्यात काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आल्यानंतर काही मंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा संदर्भ देताना शिवकुमार म्हणाले, गोव्यात अशी परिस्थिती आपण पाहिली आहे की, राज्य मंत्रिमंडळातील अनेक सदस्य काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आणि नंतर भाजपमध्ये गेले. आता असे पुन्हा होणार नाही. मी तुम्हाला शब्द देतो. मतदान करताना आपल्या अमूल्य मताचा योग्य वापर करा आणि योग्य पक्षाची निवड करा.
गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, तेलंगणा आणि कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा पराभव केला आहे आणि आता गोवा परिवर्तनाचा मार्ग दाखवेल. तेलंगणा आणि कर्नाटकनंतर गोव्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल. त्यानंतर २०२९ मध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस देशाचे नेतृत्व करेल.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी २०२७च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला २७ जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.
दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनीही भाजप सरकारवर टीका केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी अभिनेते व समाजसेवक नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अधिकारांच्या रक्षणासाठी काँग्रेसला पाठिंबा द्या!
देशात सत्ताधारी भाजपवर मतांची चोरी केल्याचे आरोप होत असल्याचे तुम्ही पाहिले आहे. त्यामुळे आपल्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा द्या. हात हे तुमच्या भवितव्याचे प्रतीक आहे. काँग्रेसला पाठिंबा देणे म्हणजे विकास आणि प्रगतीला पाठिंबा देणे, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.


