पणजी : रहिवाशांनी दाखल केलेल्या तक्रारींची दखल घेत जुने गोवा-भोमा महामार्गाच्या विस्ताराचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने बायंगिणीत उभारलेल्या कास्टिंग यार्डचे काम बंद करण्याचे आदेश जुने गोवा पंचायतीने दिले आहेत. मात्र, या आदेशाला न जुमानता यार्डचे काम सुरूच असल्याचा आरोप मिलरोक-कदंब परिसरातील रहिवाशांनी केला आहे.
रहिवाशांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, भारत पेट्रोलियम पंपामागे, सनशायन वर्ल्ड स्कूलसमोर तसेच मिलरोक-कदंब परिसरालगत भाडेपट्ट्याने घेतलेल्या जागेवर हे कास्टिंग यार्ड उभारण्यात आले आहे. या ठिकाणी पूर्वी असलेली हिरवळ नष्ट करण्यात आली असून, जड यंत्रसामग्री, मोठ्या आवाजासह धूळ आणि धुरामुळे परिसरातील रहिवासी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जड यंत्रसामग्रीचे काम सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत, तर काही वेळा रात्री ११ नंतरही सुरू असते. रविवारीही काम सुरू ठेवले जाते. यार्डमधील आवाजाची पातळी १०० डेसिबलपेक्षा अधिक असल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. यासंदर्भात २८ सप्टेंबर रोजी जुने गोवा पोलीस, पंचायत आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या.
पंचायतीने दिलेल्या काम बंदच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच कास्टिंग यार्डसाठी जमीन वापराची परवानगी, पंचायत व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मंजुऱ्या तपासाव्यात, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. यार्डच्या कामाची पाहणी करून नियमांचे उल्लंघन होत असल्यास कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.


