वाळपई : होंडा पंचायत क्षेत्रातील होंडा तिस्क ते वडाकडे या सुमारे दोन किलोमीटर मार्गाच्या रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असून, या कामासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या १२२ पेक्षा अधिक मोठ्या वृक्षांवर कुऱ्हाड चालण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून रस्ता रुंदीकरणासाठी मोजणीचे काम सुरू करण्यात आले असून, प्रस्तावित हद्दीत येणाऱ्या वृक्षांचीही पाहणी केली जात आहे.
या मार्गावरील अनेक वृक्ष वर्षानुवर्षे जुने व मोठ्या आकाराचे आहेत. उन्हाळ्यात या वृक्षांमुळे पादचारी तसेच वाहनचालकांना सावली मिळते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याच्या शक्यतेमुळे स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
दुकाने, घरे आणि कंपाउंडवर परिणाम
रस्ता रुंदीकरणाचा परिणाम केवळ वृक्षांपुरता मर्यादित राहण्याची शक्यता नसून, रस्त्यालगत असलेली काही दुकाने, घरे आणि कंपाऊंड प्रस्तावित हद्दीत येण्याची शक्यता आहे. तसेच रस्त्यालगतचे वीज खांबही स्थलांतरित करावे लागू शकतात. त्यामुळे रुंदीकरणापूर्वी बाधित नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या हरकती व सूचना विचारात घेण्याची मागणी होत आहे.
मोठी वृक्षे तोडून त्यांच्या जागी नवीन रोपे लावली तरी त्यांना सावली देणाऱ्या आकारात येण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्यामुळे विकासकामांसोबत पर्यावरणाचे संरक्षणही महत्त्वाचे असून, वृक्षतोड कमीत कमी करण्यासाठी पर्यायी आराखड्याचा विचार करावा, अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
रुंदीकरणाच्या अंतिम निर्णयापूर्वी वाहतूक गरज, उपलब्ध जागा, वृक्षांचे महत्त्व आणि नागरिकांच्या मालमत्तेवर होणारा परिणाम या सर्व बाबींचा विचार करावा, अशी मागणी होत आहे.
‘रस्ता रुंद करा, पण वृक्ष वाचवा’
स्थानिकांच्या मते, वाहतुकीची गरज लक्षात घेऊन रस्ता सुधारण्यास विरोध नाही. मात्र, संपूर्ण मार्गाचे मोठ्या प्रमाणात रुंदीकरण करण्याऐवजी ज्या ठिकाणी रस्ता अरुंद आहे, तेथेच आवश्यक तेवढे मर्यादित रुंदीकरण करण्याचा पर्याय तपासावा. शक्य त्या ठिकाणी असलेले वृक्ष जतन करून रस्ता विकसित करावा, अशी मागणी होत आहे.


