पणजी : उज्ज्वला योजनेसाठी खुल्या श्रेणीअंतर्गत अर्ज केलेले पुरुष तसेच बिगर गृह आधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे लाभार्थी अजूनही मोफत सिलिंडराच्या पैशांच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत अर्ज केलेल्या केवळ २६ टक्के लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मोफत सिलिंडरसाठीचे पैसे जमा झाले आहेत. यात गृह आधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थी महिलांचा समावेश आहे. मात्र, खुल्या श्रेणीतील अर्जदारांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही.
दरवर्षी तीन मोफत सिलिंडर देण्याची योजना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लागू केली आहे. पंचायत किंवा आमदारांच्या कार्यालयात अर्ज केल्यानंतर या योजनेअंतर्गत सिलिंडर खरेदी करण्यासाठी तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
या योजनेसाठी उत्पन्नाची मर्यादा नसली तरी सरकारने लाभार्थ्यांच्या दोन श्रेणी केल्या आहेत. पहिल्या श्रेणीत गृह आधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे लाभार्थी आहेत. दुसऱ्या म्हणजेच खुल्या श्रेणीत गृह आधार किंवा दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ न घेणारे तसेच पुरुष अर्जदार यांचा समावेश आहे.
नागरी पुरवठा खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही श्रेणींतून मिळून या योजनेसाठी सुमारे २.२ लाख अर्ज खात्याकडे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी योजनेचा लाभ मिळणाऱ्या श्रेणीतील ५८ हजार ८६६ महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. खुल्या श्रेणीतील अर्जदारांना पैसे देण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.
गृह आधार किंवा दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे बँक तपशील यापूर्वीच गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या बँक खात्यांची स्वतंत्र पडताळणी करण्याची गरज भासत नाही. त्यांना आपोआप योजनेच्या लाभार्थी म्हणून निश्चित केले जाते. मात्र, खुल्या श्रेणीतील लाभार्थ्यांचे बँक तपशील उपलब्ध नसल्याने त्यांच्या खात्यांची पडताळणी सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा केले जातील, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
खुल्या श्रेणीतील अर्जांची संगणक नोंदणी सुरू
सध्या खुल्या श्रेणीतील लाभार्थ्यांच्या अर्जांची माहिती संगणक प्रणालीत नोंदविण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक अर्जाची स्वतंत्रपणे तपासणी करावी लागत असल्याने खुल्या श्रेणीतून नेमके किती अर्ज प्राप्त झाले आहेत, हे सध्या स्पष्ट सांगता येत नाही. या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ती पूर्ण होण्यासाठी नेमका किती कालावधी लागेल, हे सांगता येणार नसल्याचेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.


