पर्वरी : पर्वरी मतदारसंघातील सुकूर ग्रामपंचायत क्षेत्रात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. विशेषत: आराडी, भुतकीवाडा आदी परिसरात सकाळी वीज गुल होण्याचे प्रकार वाढले आहेत. या संदर्भात तोडगा काढण्यात वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांना अपयश आले आहे.
विजेचा पुरवठा सुरळीत होत असल्याचे सांगण्यात येते. मात्र सुकूर पंचायत क्षेत्रात याच्या विपरित अनुभव येतो. सकाळी १० किंवा ११ वाजण्याच्या सुमारास वीज गायब होते. दुपारी १२.१५ किंवा १ वाजेपर्यंत वीज येते. यामुळे स्थानिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अधूनमधून विजेचा लपंडाव सुरूच असतो. याचा फटका दुकानदार व अन्य व्यावसायिक तसेच गृहिणांना बसतो. ही समस्या सोडविण्यासाठी वीज खात्याचे कर्मचारी तैनात केले जातात. मात्र त्यांना कायमस्वरूपी तोडगा काढण्यात अद्याप यश आलेले नाही. वीज खात्याने या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.
एका बाजूला नवनवी बांधकामे उभी राहत असून लोकसंख्याही वाढत आहे. मात्र विजेसारख्या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे गरेजेचे आहे. कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वीज खंडित केली जात असल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.
हेल्पलाईन ‘हेल्पलेस’!
वीज विषयक समस्येबाबत माहिती देण्यासाठी राज्य सरकारने ०८३२ २४९०८०० ही हेल्पलाईन सुरू केली आहे. सुरुवातीला या हेल्पलाईनवर तक्रार केल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळत असे. मात्र अलीकडे ही हेल्पलाईन ‘हेल्पलेस’ झाल्याचे दिसून येते. तक्रार केल्यानंतर ‘तुमची तक्रार आम्ही संबंंधित विभागाकडे पोहचवू,’ इतकेच आश्वासन मिळते. प्रत्यक्षात त्या तक्रारीनंतर ज्या वेगाने कार्यवाही व्हायला हवी, ती होताना दिसत नाही. काही वेळानंतर पुन्हा संपर्क साधला, तरी वीज नेमकी का गेली, कधी पुन्हा कार्यान्वित होणार, वीज कर्मचारी कुठल्या भागात कार्यरत आहेत, अशा साध्या प्रश्नांची उत्तरेही हेल्पलाईनचा डेस्क देऊ शकत नाही. त्यामुळे ही हेल्पलाईन नेमकी सुरू कशासाठी ठेवली आहे, असा प्रश्न निर्माण होतो.


