रणनीती, निवडणुकीच्या तयारीवर भाजपचे विचारमंथन

निवडणूक प्रभारी भारती पवार, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्यासह मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
05th October, 11:27 pm
रणनीती, निवडणुकीच्या तयारीवर भाजपचे विचारमंथन

पणजी : सोमवारी भाजपच्या गाभा समितीची बैठक पार पडली. बैठकीत गोवा निवडणूक प्रभारी डॉ. भारती पवार, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश , मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. वरिष्ठांकडून निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. तसेच निवडणुकीसाठी पक्षातर्फे आखण्यात आलेल्या विविध मोहिमा, उपक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी गोव्याच्या संदर्भात विविध विषयांची चर्चा देखील झाली.
याबाबत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले की, बैठकीत निवडणुकी संदर्भात विविध विषयांवर चर्चा झाली. वरिष्ठांनी निवडणुकीत आखण्यात येणाऱ्या नीतीची सविस्तर माहिती दिली. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या दरम्यान राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती आम्हाला देण्यात आले. हे दोन्ही नेते गोव्यात आल्याने पक्षाच्या निवडणूक तयारीला अधिक चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे डबल इंजिन सरकार गोव्यात पुन्हा एकदा यश मिळवेल अशी आम्हाला खात्री आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले की, भाजपच्या नियमित प्रक्रियेनुसार आजच्या बैठका झाल्या आहेत. आमचा पक्ष चोवीस तास लोकांसाठी आणि लोकांमध्येच असतो. वेगवगेळे अभियान, मोहिमा, केंद्राने दिलेल्या सूचना घेऊन आम्ही सतत लोकांमध्ये जात असतो. निवडणुका जवळ आल्या म्हणून पाच वर्षातून एकदा आम्ही लोकांमध्ये जात नाही. आम्ही नेहमीच लोकांमध्ये असतो. यामुळेच आमचा जनाधार वाढत आहे.
डॉ. पवार यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील पंचवीस वर्षे सार्वजनिक क्षेत्रात सेवा केली आहे. यासाठी आम्ही सेवा संकल्प यात्रा सुरू केली आहे. या यात्रेमध्ये आता लोक स्वतःहून सामील होत आहेत. सेवा संकल्प अभियानाविषयी बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. मंत्री रमेश तवडकर यांनी बैठकीत गोव्याच्या संदर्भात विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगितले. यावेळी एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्याच्या विषयावर चर्चा देखील झाली असे त्यांनी सांगितले.             

हेही वाचा
सर्व पहा