नवी दिल्ली : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देशपातळीवर प्रथमच आयोजित केलेल्या ‘स्प्रिंग सेन्सस’ अर्थात नैसर्गिक झऱ्यांच्या गणनेच्या दुसऱ्या टप्प्यामधील अहवाल नुकताच जाहीर केला आहे. २५ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या ९ व्या ‘इंडिया इंटरनॅशनल वॉटर वीक २०२६’ च्या सांगता समारंभात हा अहवाल अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला. या पहिल्या टप्प्यातील गणनेत आंध्र प्रदेश, आसाम, गोवा, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, राजस्थान, तेलंगणा, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या १० राज्यांचा समावेश करण्यात आला असून, एकूण १४,४६८ नैसर्गिक झऱ्यांची नोंद करण्यात आली आहे.

या अहवालानुसार, देशातील सुमारे १५ टक्के म्हणजेच जवळपास २० कोटी नागरिक आपल्या दैनंदिन गरजांसाठी थेट किंवा अप्रत्यक्षपणे या नैसर्गिक झऱ्यांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. जलसंधारण, विकास योजना आणि भविष्यातील धोरणात्मक निर्णय सोपे व्हावेत या उद्देशाने मोबाईल ॲप आणि केंद्रीय वेब प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा संपूर्ण डेटाबेस डिजिटल पद्धतीने तयार करण्यात आला आहे.

एकूण आकडेवारीचा विचार करता, मणिपूरमध्ये सर्वाधिक ३,९४१ आणि महाराष्ट्रात ३,६५२ झरे आढळले आहेत. महाराष्ट्रातील ३,६५२ झऱ्यांपैकी २,६२९ झरे वर्षभर वाहणारे, ९०९ हंगामी आणि ११४ कोरडे पडलेले आहेत. यातील ८६.५ टक्के झरे सार्वजनिक तर १३.५ टक्के खाजगी मालकीचे आहेत. महाराष्ट्रातील मूल्यमापन केलेल्या झऱ्यांपैकी २६५ झरे विविध धोक्यांना तोंड देत आहेत, तर मणिपूरमधील सर्वाधिक १,३३६ झरे संकटात असल्याचे समोर आले आहे.
याशिवाय ओडिशामध्ये १,९५७, पश्चिम बंगालमध्ये १,६८६, गोव्यात १,१९६, त्रिपुरामध्ये १,०४९, आसाममध्ये ७९२, तेलंगणामध्ये १४८, आंध्र प्रदेशात ३४ आणि राजस्थानमध्ये १३ झरे नोंदवले गेले आहेत. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग आणि कलिम्पोंग या डोंगरी जिल्ह्यांमध्ये स्थानिक व आदिवासी समुदायांसाठी हे झरे पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत ठरत आहेत.
![Goa Raja Waterfall: Hidden Gem or Tourist Trap? [2026]](https://www.baliholidaysecrets.com/wp-content/uploads/2026/09/swimming-pool-at-goa-raja-waterfall.webp)
पायाभूत सुविधांची उभारणी करताना या नैसर्गिक झऱ्यांचे आणि त्यांच्या उगम क्षेत्रांचे जतन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. जलस्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन आणि वैज्ञानिक अभ्यासासाठी नियमित देखरेख व पद्धतशीर डेटाबेस असणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी या प्रसंगी केले.



