करंझाळे किनाऱ्यावर २४ तास पोलिसांची गस्त हवी : रापणकार संघटनेची मागणी

करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर बेकायदेशीर घटना वाढल्या आहेत. किनाऱ्यावर दारू पिणे, दंगामस्ती करणे अशा घटनात वाढ होत आहे. मोठ्या घटना घडल्यास येथे काही काळ पोलिसांची गस्त असते. मात्र दोन-तीन दिवसांनंतर पोलीस पुन्हा गायब होतात. या किनाऱ्यावरील अवैध गोष्टी थांबवण्यासाठी येथे २४ तास पोलिसांची गस्त हवी आहे; अशी मागणी करंझाळे रापणकार संघटनेचे फ्रान्सिस वाझ यांनी केली.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
1 hours ago
करंझाळे किनाऱ्यावर २४ तास पोलिसांची गस्त हवी : रापणकार संघटनेची मागणी

पणजी : करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर बेकायदेशीर घटना वाढल्या आहेत. किनाऱ्यावर दारू पिणे, दंगामस्ती करणे अशा घटनात वाढ होत आहे. मोठ्या घटना घडल्यास येथे काही काळ पोलिसांची गस्त असते. मात्र दोन-तीन दिवसांनंतर पोलीस पुन्हा गायब होतात. या किनाऱ्यावरील अवैध गोष्टी थांबवण्यासाठी येथे २४ तास पोलिसांची गस्त हवी  आहे; अशी मागणी करंझाळे रापणकार संघटनेचे फ्रान्सिस वाझ यांनी केली.

सोमवारी किनाऱ्यावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. वाझ यांनी सांगितले की, नुकतीच किनाऱ्यावर एका अल्पमयीन मुली बरोबर घडलेली घटना दुर्दैवी आहे. यामध्ये पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.  काही लोक ती व्यक्ती आमच्याकडे कामगार म्हणून काम करत असल्याची चुकीची माहिती देत आहेत.

त्या व्यक्तीचा आणि आमचा काहीही संबंध नाही. संघटनेतील कोणत्याही मच्छीमाराकडे ती व्यक्ती काम करत नव्हती. या किनाऱ्यावर काहीही झाले तर त्याचा संबंध मच्छीमारांची जोडणे चुकीचे आहे. आमच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना आम्ही लवकरच ओळखपत्र देणार आहोत.

ते म्हणाले, ओळखपत्राविषयी आम्ही मत्स्योद्योग खात्याच्या संचालिका शमीला मोन्तेरो यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी देखील हा प्रस्ताव मान्य केला आहे. येणाऱ्या आठवड्यात ओळखपत्र देण्याचे काम पूर्ण होईल. याशिवाय कामगारांच्या आधार कार्ड व अन्य कागदपत्रांची प्रत आम्ही आमच्याकडे ठेवली आहे. 

रात्री येथे लोक दारू पिण्यासाठी येतात. पोलिसांनी (Goa Police) त्यांना धरल्यास आपण रापणकारांचे कामगार असल्याची खोटी माहिती देतात. यामुळे कामगारांना ओळखपत्र देणे आवश्यक झाले आहे. किनाऱ्यावर चुकीचे प्रकार घडू नये यासाठी पर्यटक पोलीस व अन्य खात्यांनी देखील पुढाकार घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा
सर्व पहा