नारीशक्ती महोत्सवात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटवस्तू देताना आमदार प्रवीण आर्लेकर. सोबत माजी आमदार दयानंद सोपटे व इतर. (निवृत्ती शिरोडकर)
गोवन वार्ता प्रतिनिधी
पेडणे
पेडणे आणि मांद्रे मतदारसंघांत भाजपचे कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. दोन्ही मतदारसंघांत पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पेडणे आणि मांद्रे मतदारसंघांचा सेवा संकल्प अभियान गोवा उज्ज्वला योजना वचनपूर्ती नारीशक्ती महोत्सव पेडणे येथे रविवारी पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे, पेडणे भाजप मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, मांद्रे भाजप मंडळाचे अध्यक्ष उत्तम पोखरे, महिला सरचिटणीस उषा नागवेकर, जिल्हा पंचायत सदस्य श्रीकृष्ण हरमलकर व इतर उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, भाजपने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांना विविध योजनांद्वारे आर्थिक आधार दिला जात आहे. स्वयंरोजगार, उद्योग आणि विविध क्षेत्रांत उभे राहण्यासाठी महिलांना संधी उपलब्ध करून दिली जात आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयांचा उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांनी तीन तलाक कायद्यातील बदल, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित भूमिका आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ यांचा उल्लेख केला. गोव्यात आगामी काळातही विविध विकासकामे आणि योजनांची अंमलबजावणी सुरू राहणार आहे. पेडणे आणि मांद्रे मतदारसंघांतील कार्यकर्त्यांनी संघटनात्मक पातळीवर सक्रिय राहावे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका महत्त्वाची आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे यांनीही भाषण केले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग हे मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरले. सूत्रसंचालन उषा नागवेकर यांनी केले.
आश्वासनांच्या पूर्ततेवर भर : दामू नाईक
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले, भाजप केवळ आश्वासने देत नाही, तर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करतो. ‘माझे घर’ योजनेमुळे अनेक कुटुंबांना निवारा मिळाला. शिक्षण क्षेत्रातही विद्यार्थ्यांना विविध योजना, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक साहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.


