कोलवाळ येथे भीषण अपघात; उपचारादरम्यान मुंबईतील महिला पर्यटकाचा मृत्यू

कोलवाळ येथे भाड्याने घेतलेल्या दुचाकीवरून जाणाऱ्या मुंबईतील पर्यटक कुटुंबाच्या वाहनाला भरधाव स्कार्पिओ कारने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिला पर्यटकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.


59 mins ago
कोलवाळ येथे भीषण अपघात; उपचारादरम्यान मुंबईतील महिला पर्यटकाचा मृत्यू

पणजी : गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. उत्तर गोव्यातील कोलवाळ येथे घडलेल्या एका अत्यंत भीषण रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुंबईतील एका महिला पर्यटकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून महामार्गावरील वाहनांच्या अनिर्बंध वेगावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, हे पर्यटक कुटुंब भाड्याने घेतलेल्या दुचाकीवरून जात होते. यावेळी वाहनावर पती, पत्नी आणि त्यांची लहान मुलगी असे तिघे जण स्वार होते. कोलवाळ महामार्गावरून जात असताना, मागून येणाऱ्या एका भरधाव स्कार्पिओने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले आणि दुचाकी बऱ्याच अंतरापर्यंत घसरत गेली.

या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र वैद्यकीय उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सुदैवाने, या अपघातात त्यांची लहान मुलगी आणि पती सुखरूप वाचले आहेत.

अपघात घडल्यानंतर स्कार्पिओ चालकाने घटनास्थळावरून गाडी पळवून नेण्याचा आणि चालक बदलण्याचा प्रयत्न केल्याचा संशय प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेली चारचाकी गाडी ही महाराष्ट्राच्या पासिंगची असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची रीतसर नोंद केली असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा आणि चालकाचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.



हेही वाचा
सर्व पहा