पणजी: गोव्यातील हिवाळी पर्यटन हंगामाला अधिकृतपणे सुरुवात झाली असून मॉस्कोहून आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चार्टर विमानाचे दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. एरोफ्लोटद्वारे संचालित या विमानातून २८५ हून अधिक प्रवासी गोव्यात दाखल झाले आहेत. यासोबतच २३ ऑक्टोबरपासून अल्माटी ते दाबोळी आणि ३० डिसेंबरपासून अस्ताना ते मोपा अशी नवी चार्टर विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती पर्यटन संचालक केदार नाईक यांनी दिली आहे.
याआधी येकातेरिनबर्ग येथूनही चार्टर सेवा सुरू झाली असून त्याद्वारे १६२ प्रवाशांची क्षमता असलेली विमाने गोव्यात येत आहेत. रशिया हा गोव्याच्या पर्यटन अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय स्रोत मानला जातो. मॉस्कोहून थेट विमानसेवा सुरू झाल्याने रशियातील प्रमुख शहरांशी गोव्याची थेट हवाई वाहतूक अधिक मजबूत झाली आहे. यामुळे आगामी काळात राज्यातील पर्यटन क्षेत्राला मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कझाकस्तानशी असलेली हवाई संपर्क व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी स्कॅट एअरलाईन्स आपली अल्माटी ते दाबोळी चार्टर सेवा २३ ऑक्टोबरपासून सुरू करणार आहे. ही सेवा २५ डिसेंबरपर्यंत आठवड्यातून एकदा दर शुक्रवारी चालवली जाईल. त्यानंतर २९ डिसेंबर ते २ एप्रिल या कालावधीत ती आठवड्यातून दोनदा म्हणजे दर मंगळवारी आणि शुक्रवारी कार्यान्वित राहील. याशिवाय एअर अस्ताना ही कंपनी ३० डिसेंबरपासून अस्ताना आणि मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी नवी सेवा सुरू करणार असून ती ३१ मार्चपर्यंत दर बुधवारी चालवली जाणार आहे.
रशियन पर्यटकांच्या या आगमनाचे स्वागत करताना राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले की, मॉस्कोहून पहिल्या चार्टरचे आगमन ही गोव्याच्या हिवाळी पर्यटन कार्यक्रमाची एक दमदार सुरुवात आहे. रशिया ही गोव्यासाठी नेहमीच महत्त्वाची बाजारपेठ राहिली असून या नियमित विमानसेवेमुळे गोव्याची आंतरराष्ट्रीय पर्यटनातील मागणी पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय वाहतूक अधिक मजबूत करून पर्यटनाचा प्रवाह वाढवण्यावर भर दिला जाईल.


