मडगाव : मडगाव शहरातील ऐतिहासिक व गजबजलेल्या गांधी मार्केटमधील स्वच्छतागृहाजवळ असलेल्या जुन्या मीट शॉप इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने, दुर्घटना घडली त्या वेळी परिसरात विक्रेते किंवा ग्राहक उपस्थित नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही. तथापि, या घटनेमुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या आणि नियमित येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सुमारे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास मीट शॉपच्या जुन्या इमारतीचा एक भाग अचानक कोसळला. पहाटेच्या वेळी बाजारपेठेत आलेल्या काही विक्रेत्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी तात्काळ स्थानिक प्रतिनिधी राजेंद्र आजगावकर यांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच आजगावकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि घडलेल्या प्रकाराबाबत मडगाव नगरपालिका प्रशासनाला तातडीने अवगत केले.
दरम्यान, पहाटे इमारतीचा एक भाग कोसळल्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्याच बांधकामाच्या दुसऱ्या बाजूचा मोठा भागही अचानक खाली कोसळला. सुदैवाने, सकाळच्या वेळी ती इमारत अत्यंत धोकादायक बनल्याचे लक्षात आल्याने पालिका व स्थानिक प्रशासनाने विक्रेत्यांना त्या भागात बसण्यास आधीच मनाई केली होती. प्रशासनाच्या या सतर्कतेमुळे एक मोठी संभाव्य दुर्घटना टळली आणि सर्वजण सुरक्षित राहिले.
सदर इमारत ही पूर्णपणे मडगाव पालिकेच्या ताब्यात असल्याने तिची वेळेवर दुरुस्ती व देखभाल करणे आवश्यक होते. त्यामुळे पालिकेने आता तरी जागे होऊन गांधी मार्केटमध्ये दररोज येणारे शेकडो विक्रेते आणि ग्राहक यांच्या जिवाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी राजेंद्र आजगावकर यांनी केली आहे. धोकादायक बांधकामांची पाहणी करून त्यावर योग्य ती कारवाई करण्याची गरजही व्यक्त होत आहे.


