बाटल्या फेकण्यास विरोध केल्याने कारवारमध्ये नौदल कर्मचाऱ्यावर हल्ला

कारवार येथील नागरमुडी धबधब्यावर पाण्यात बाटल्या फेकण्यास विरोध केल्याने भारतीय नौदलातील कर्मचाऱ्यावर काही जणांनी क्रिकेट बॅटने हल्ला केला. या प्रकरणी कारवार ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
39 mins ago
बाटल्या फेकण्यास विरोध केल्याने कारवारमध्ये नौदल कर्मचाऱ्यावर हल्ला

कारवार: कारवार तालुक्यातील प्रसिद्ध नागरमुडी धबधब्यावर पर्यटनस्थळाची स्वच्छता राखण्याचा आणि पाण्यात बाटल्या न फेकण्याचा सल्ला देणे एका नौदल कर्मचाऱ्याला महाग पडले आहे. कचरा टाकण्यास विरोध केल्याच्या कारणावरून काही हुल्लडबाजांनी भारतीय नौदलातील कर्मचाऱ्यावर क्रिकेटच्या बॅटने आणि लाथाबुक्क्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडून आली आहे. या प्रकरणी पीडित कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून कारवार ग्रामीण पोलिसांनी रीतसर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तोळणाका-अमदळ्ळी येथील रहिवासी आणि भारतीय नौदलात कार्यरत असलेले इंदेश कोलंबकर हे त्यांचे मित्र सर्वेश चिंचणकर यांच्यासोबत दुचाकीवरून नागरमुडी धबधब्यावर गेले होते. त्यावेळी धबधब्याच्या परिसरात सुमारे १६ ते १७ जणांचा समूह पाण्यात रिकाम्या बाटल्या फेकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पर्यटनस्थळी कचरा करू नये आणि बाटल्या पाण्यात फेकू नयेत असा सल्ला इंदेश यांनी त्या समूहाला दिला. मात्र, यावरून वाद निर्माण होऊन त्या समूहातील काही जणांनी इंदेश यांना खाली पाडून मारहाण केली.

या घटनेनंतर इंदेश तेथून निघून गेले असता, धबधब्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर काही जणांनी पुन्हा त्यांचा मार्ग अडवला. यावेळी एका व्यक्तीने क्रिकेटच्या बॅटने इंदेश यांच्या डोक्यावर वार केला, तर दुसऱ्याने त्यांच्या नाकावर मारल्याने ते जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच इंदेश यांचा भाऊ तेथे पोहोचला आणि त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, हुल्लडबाजांनी त्याच्यावरही हल्ला करत त्याचा टी-शर्ट फाडला.

पर्यटनस्थळी कचरा टाकण्यास विरोध केल्यावरून झालेल्या या मारहाणीमुळे नागरमुडी धबधब्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. पर्यटनस्थळांवर अशा प्रकारची हुल्लडबाजी आणि कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. कारवार ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेत सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी वेगाने तपास सुरू केला आहे.

हेही वाचा
सर्व पहा