मिरामार किनाऱ्यावर ११ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; संशयिताला अटक

मिरामार किनाऱ्यावर एकाने ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला निर्जन ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची घटना समोर आली.पणजी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
मिरामार किनाऱ्यावर ११ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; संशयिताला अटक

पणजी: मिरामार समुद्रकिनाऱ्यावर एका ११ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली असून किनाऱ्यावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पणजी पोलिसांनी तात्काळ पावले उचलत प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.   

माहितीनुसार, काल दुपारी पीडित मुलगी मिरामार येथून करंजाळे येथे किनाऱ्यामार्गे नातेवाईकांकडे जात होती. त्याच वेळी किनाऱ्यावरच वास्तव्यास असणाऱ्या जीवन कुमार ओली (२२, मूळ नेपाळ) याने तिला गाठले आणि फूस लावून एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगानंतर प्रचंड मानसिक धक्क्यात असलेली मुलगी घाबरलेल्या अवस्थेत घरी पोहोचली. घरी आल्यानंतर तिने आपल्या नतेवाईकाला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला.   

तिच्या नातेवाईकाने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पणजी पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून तपासाची चक्रे वेगाने हलवली.  सध्या पोलिसांनी पीडितेचा अधिकृत जबाब नोंदवण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. यासोबतच, नियमानुसार तिची वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस प्रशासन आवश्यक ती पुढील कार्यवाही करत आहे. संशयिताची ओळख पटवून त्याला ताब्यात घेत अटक केली असून निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या नेतृत्त्वाखाली महिला उपनिरीक्षक दीपिका पवार या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.