म्हापसा : आगशी येथील कॅनरा बँक शाखेमधील गुन्हेगारी कट कारस्थान आणि पदाचा गैरवापर करून परस्पररित्या ११ ग्राहकांच्या ४७ मुदत ठेवी बंद करत ३ कोटी रुपये रक्कम लाटण्यात आली. याप्रकरणी सीबीआयच्या गोवा विभागाने बँकेच्या दोघा शाखा मॅनेजरसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संशयित आरोपींमध्ये हिंद दीप वालिया (बॅंकेचे माजी अधिकारी), अख्तर मोमीन (बँकेचे सिंगल विंडो ऑपरेटर), ए. गिरीश कुमार (माजी शाखा व्यवस्थापक), स्वप्नील अहिरे (माजी बँक व्यवस्थापक) तसेच संध्या तिवारी (रा. गॅलेक्सी रेसिडेन्सी पर्वरी), राजेश कुमार मलिक (रा. ओडिशा) व इतर अज्ञात व्यक्तींचा समावेश आहे.
सीबीआयच्या चौकशीमध्ये आढळून आले की, १७ मे २०२३ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आरोपी अख्तर मोरीन याने २ कोटी ३३ लाख ८६ हजार ५४५ रुपये रकमेच्या ४२ मुदत ठेवी बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली. या प्रक्रियेला अधिकारी हिंद दीप वालिया याने मंजुरी दिली. तर आरोपी एन गिरीश कुमार मलिक या शाखा व्यवस्थापकाने अधिकारी हिंद दीप वालिया याच्या मान्यतेने १६ मे २०२३ रोजी १६ लाख ८६ हजारांची एक मुदत ठेव बंद केली. तसेच आरोपी शाखा व्यवस्थापक स्वप्नील अहिरे याने अधिकारी हिंद दीप वालिया याच्या मान्यतेने ८ लाख ९९ हजार ३२१ रुपयांच्या चार मुदत ठेवी बंद केल्या. अशा एकूण ३ कोटी ३ लाख ८ हजार ४४४.२१ रुपये रकमेचा ११ ग्राहकांना गंडा घालण्यात आला.
या रकमेपैकी आरोपी हिंद दीप वालिया याने आपल्या विविध तीन बँक खात्यांमध्ये एकूण ३ कोटी ३ लाख ८ हजार ४४४ रुपये रक्कम हस्तांतरित केली. तर, आरोपी संध्या तिवारी यांनी ३७ लाख ५० हजार रुपये रक्कम आपल्या खात्यात हस्तांतरित केली. एन राजेश कुमार मलिक याने १३ लाख ५० हजार रुपये रक्कम आपल्या खात्यात जमा केली.
याप्रकरणी पुढील तपास सीबीआयचे निरीक्षक नीलेश शिरोडकर हे करत आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
हा अफरातफर आणि फसवणुकीचा प्रकार १ मे २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षाच्या कालावधीत घडला आहे. आरोपींनी मुदत ठेव ग्राहकांना पूर्वसूचना किंवा त्यांची मान्यता न घेता ही अफरातफर केली होती. गोपनीय माहितीच्या आधारे सीबीआय गोवा विभागाने दि. २२ सप्टेंबर रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.


