मडगाव : मडगावच्या आके परिसरात २००८ मध्ये झालेल्या खूनप्रकरणातील संशयित परशुराम दोरणहळ्ळी याची दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. परशुराम आणि त्याची पत्नी रेणुका दोरणहळ्ळी यांच्यावर भीमाप्पा ऊर्फ भीमसेन कोडाग्नूर याचा खून केल्याचा आरोप होता.
या प्रकरणात संशयित परशुराम दोरणहळ्ळी आणि त्याची पत्नी रेणुका दोरणहळ्ळी हे आके येथे राहत होते. त्यांच्यासोबत भीमाप्पा ऊर्फ भीमसेन कोडाग्नूर (४५) हा राहत होता. भीमाप्पा हा दारूच्या नशेत रेणुकाला त्रास देत तसेच तिच्यावर मारहाण करीत असल्याने रागातून दोघांनी मिळून त्याचा गळा आवळून खून केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला होता.
खून केल्यानंतर मृतदेह त्याच खोलीतील स्वच्छतागृहात पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले होते. त्यानंतर परशुराम कर्नाटकातील मूळ गावी गेल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. दरम्यान, या प्रकरणातील सहआरोपी रेणुका हिचा मृत्यू झाला.
पुराव्यांच्या आधारे न्यायालयीन सुनावणी
मडगाव पोलिसांनी तपास पूर्ण करून घरमालक व अन्य साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळाचा पंचनामा तसेच हाडांची वैद्यकीय तपासणी यांसह विविध पुरावे न्यायालयासमोर सादर केले होते. परशुरामविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ आणि २०१ अन्वये आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने निकाल देताना परशुराम दोरणहळ्ळी याची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली.


