विनयभंग, लैंगिक शोषणाच्या आरोपातून ४२ वर्षीय संशयित निर्दोष

साक्षीतील तफावत, लग्न सोहळ्यातील पुरावे ठरले महत्त्वाचे


27th September, 10:53 pm
विनयभंग, लैंगिक शोषणाच्या आरोपातून ४२ वर्षीय संशयित निर्दोष

पणजी : घटनेच्या वेळी संशयित हा पीडित मुलीची मोठी बहीण हिच्यासोबत विवाह सोहळ्यात उपस्थित असल्याचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. तसेच साक्षीदारांच्या जबाबातील तफावत आणि कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी लक्षात घेता विनयभंग व लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत संशय निर्माण होत असल्याचे निरीक्षण मेरशी येथील पॉक्सो न्यायालयाने नोंदविले. या आधारावर बार्देश तालुक्यातील ४२ वर्षीय संशयिताची १६ वर्षीय मुलीचा विनयभंग व लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. याबाबतचा आदेश न्या. डॉ. पूजा कवळेकर यांनी दिला.

या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून कोलवा पोलिसांनी ११ जानेवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल केला होता. पीडित मुलगी तिच्या मोठ्या बहिणीसोबत राहत होती. संशयित हा तिच्या मोठ्या बहिणीच्या ओळखीचा होता. त्यानंतर पीडितेची मोठी बहीण पतीला सोडून संशयितासोबत राहू लागली. या पार्श्वभूमीवर संशयिताविरोधात १८ आणि २२ डिसेंबर २०२२ रोजी दोन कथित घटना घडल्याचा आरोप करण्यात आला होता.

पहिल्या घटनेत संशयिताने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा, तर दुसऱ्या घटनेत स्वयंपाकघरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा करण्यात आला होता. संशयित आणि पीडितेच्या मोठ्या बहिणीमधील संबंधांमुळे त्या काळात कौटुंबिक वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी कोलवा पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून तपास केला आणि त्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, संशयितातर्फे अॅड. वहिदा यलगार यांनी बाजू मांडली.

या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून संशयिताची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.

कौटुंबिक वादातून गुन्हा रचल्याचा दावा

पीडित आणि इतरांनी दिलेल्या जबाबात विरोधाभास व त्रुटी आहेत. तक्रार नोंदवण्यास विनाकारण विलंब झाला आहे आणि दुसऱ्या कथित प्रसंगाच्या वेळी २२ डिसेंबर रोजी संशयित पीडितेच्या बहिणीसोबत एका लग्न सोहळ्याला उपस्थित होता. या संदर्भात न्यायालयात लग्नाची पत्रिका आणि छायाचित्रे सादर केली आहेत. तसेच हा गुन्हा कौटुंबिक वाद आणि वैमनस्यातून रचलेला बनाव असल्याचा दावा संशयितातर्फे अॅड. वहिदा यलगार यांनी केला. 

हेही वाचा
सर्व पहा