पणजी: जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून गोवा राज्याच्या पर्यटन विभागातर्फे राज्यातील आत्तापर्यंतच्या सर्वांत मोठ्या 'टुरिझम स्टेकहोल्डर्स मीट'चे भव्य आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने पार पडले. या प्रसंगी पर्यटन संचालक केदार नाईक, टीटीएजीचे अध्यक्ष जॅक सुखिजा, जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर आणि जीसीसीआयच्या अध्यक्षा प्रतिमा धोंड यांच्यासह राज्यातील अनेक प्रमुख पर्यटन भागधारक उपस्थित होते. या परिषदेत उपस्थितांना संबोधित करताना पर्यटनमंत्र्यांनी राज्याच्या पर्यटन धोरणात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली
परिषदेला संबोधित करताना पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले की, केवळ पर्यटकांची संख्या वाढवणे हे गोवा सरकारचे उद्दिष्ट नसून पर्यटनाची गुणवत्ता उंचावणे आणि शाश्वत विकास साधणे ही काळाची गरज आहे. पर्यावरणाचा समतोल राखून पर्यटनाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशासनासह हॉटेल व्यावसायिक, टूर ऑपरेटर्स आणि स्थानिक भागधारकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकार २०२२ सालापासून पर्यटनाच्या पारंपरिक संकल्पनेत बदल करत असून, केवळ 'सन, सँड आणि सी' यापुरते मर्यादित न राहता गोव्याच्या नैसर्गिक व सांस्कृतिक वारशाचा प्रसार केला जात आहे. 'गोवा बियाँड बीचेस' या उपक्रमांतर्गत ग्रामीण भाग, निसर्ग पर्यटन, स्थानिक खाद्यसंस्कृती, वेलनेस, साहसी उपक्रम, आयुर्वेद, योग आणि अध्यात्मिक पर्यटनाला विशेष प्रोत्साहन दिले जात आहे.
या धोरणाचा भाग म्हणून उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोव्याच्या अंतर्गत व ग्रामीण भागातील निसर्ग पर्यटनाला शिस्त लावण्यासाठी पावले उचलली जात आहेत. ग्रामीण भागातील 'कायाकिंग' पॉईंट्सची हद्द पुढील सात ते आठ दिवसांत निश्चित केली जाईल. या भागात केवळ कायकिंगसारख्या पर्यावरणपूरक आणि नॉन-मोटराइज्ड उपक्रमांनाच परवानगी दिली जाईल, तर जेट स्कीसारख्या इंजिनवर चालणाऱ्या व प्रदूषण करणाऱ्या वॉटर स्पोर्ट्सला सक्त मनाई असेल. यामुळे ग्रामीण भागातील शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखण्यास मदत होईल.
दरम्यान, पर्यटन व्यावसायिकांना मोठा दिलासा देताना पर्यटन मालमत्तांच्या नोंदणी आणि नूतनीकरण अर्जांसाठीची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आल्याचे पर्यटनमंत्र्यांनी जाहीर केले. वार्षिक नियमावलींचे पालन करण्याच्या अटीवर 'अ' आणि 'ब' श्रेणीतील चार व पाच तारांकित हॉटेल्सना पाच वर्षांसाठी नोंदणी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसेच, नूतनीकरणाची प्रक्रिया १० दिवसांच्या आत पूर्ण केली जाईल, अन्यथा ते नूतनीकरण आपोआप मंजूर झाले म्हणजेच 'डीम्ड अप्रूव्ह्ड' मानले जाईल, असे प्रशासकीय सुधारणांचे आश्वासन त्यांनी दिले.
पर्यटन क्षेत्रातील पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी सर्व हॉटेल्स, होमस्टे, खाजगी शॅक्स आणि संबंधित व्यावसायिक उपक्रमांसाठी अग्निसुरक्षा परवाना आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स अनिवार्य करण्यात आला आहे. कलंगूट, कांडोलीम, मोरजीम आणि मांद्रे या भागांत झालेल्या तपासणीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले असून बेकायदेशीर व अनोंदणीकृत होमस्टेवर कडक नजर ठेवली जात आहे. ऑनलाइन लिस्टिंगच्या माध्यमातून अशा अनधिकृत निवासांचा शोध घेतला जात असून, हाऊसिंग सोसायट्यांनी व नागरिकांनी याबाबतची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमादरम्यान गोव्यातील पर्यटनाला डिजिटल माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचवणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला. यात प्रथमेश म्हावळिंगकर यांना पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते 'सर्वोत्कृष्ट गोवन इन्फ्लुएन्सर पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले.


