पणजी : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विशाल कृष्णा गोव्यात त्याच्या आगामी 'पुरुषन' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका स्टंट दृश्याचे चित्रीकरण करताना जखमी झाला आहे. दिग्दर्शक सुंदर सी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या एका महत्त्वाच्या आणि कठीण स्टंट शॉटचे चित्रीकरण सुरू असताना त्याच्या पाठीला गंभीर दुखापत झाली.

या घटनेनंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीअंती डॉक्टरांनी विशालला पूर्णपणे बरे होण्यासाठी तीन आठवड्यांची कडक विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या अधिकृत निवेदनात विशालने माहिती दिली की, यापूर्वी अनेक कठीण स्टंट्स यशस्वीपणे केले असले तरी हा प्रसंग एका दुर्दैवी अपघातात बदलला. हा आठवडा आपल्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण राहिला असून पाठीच्या दुखापतीमुळे नादिगर संगमच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहता येत नसल्याचे अत्यंत दुःखास्पद आणि त्रासदायक आहे. २७ सप्टेंबर रोजी होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाची असून आरोग्य साथ देत नसल्याने प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नसले तरी आपले लक्ष या बैठकीच्या कामकाजावर आणि उपस्थित सदस्यांवर असेल, अशी भावना त्याने व्यक्त केली.


