कोल्हापूर : देश १९४७ साली स्वतंत्र झाला, मात्र गोव्याला स्वातंत्र्यासाठी आणखी १४ वर्षे संघर्ष करावा लागला. पोर्तुगीजांच्या पारतंत्र्यातून गोव्याला मुक्त करण्यासाठी हजारो स्वातंत्र्यवीरांनी प्राणांची आहुती दिली. हाच ज्वलंत आणि शौर्यगाथेने भरलेला गोवा मुक्तिसंग्राम यंदा कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सजीव झाला. कोल्हापूरच्या 'लेटेस्ट तरुण मंडळा'ने साकारलेल्या गोवा मुक्तिसंग्रामाच्या सजीव देखाव्याने संपूर्ण मिरवणुकीचे लक्ष वेधून घेतले.
स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान, गोमंतकीय जनतेचा लढा आणि पोर्तुगीज सत्तेविरुद्ध पेटलेली क्रांतीची ज्वाला या देखाव्यातून हुबेहूब उभी करण्यात आली होती. अंगावर काटा आणणारे सादरीकरण आणि ऐतिहासिक मांडणीमुळे हा देखावा मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरला.विशेष म्हणजे गोव्याच्या मुक्तिलढ्यात कोल्हापूरच्या अनेक वीरांनीही मोलाचे योगदान दिले आहे. या स्वाभिमानी इतिहासाला उजाळा देण्याचे काम लेटेस्ट तरुण मंडळाने या देखाव्यातून केले आहे.
या देखाव्याची दखल थेट गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली आहे. मंडळाच्या राष्ट्रभक्तीपर उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले असून, नव्या पिढीसमोर इतिहासाचा हा महत्त्वाचा अध्याय इतक्या प्रभावीपणे मांडल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.मुख्यमंत्र्यांकडून दखल मिळाल्याने लेटेस्ट तरुण मंडळाच्या या देखाव्याची चर्चा आता केवळ कोल्हापूरपुरती मर्यादित न राहता संपूर्ण गोव्यातही होत असून, सोशल मीडियावरही या देखाव्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.


