गोव्यात टॅक्सी, मोटर कॅबचे नवीन भाडेदर प्रशासनाकडून लागू

वाहनाची इंजिन क्षमता, वाहनांच्या प्रकारानुसार दर निश्चित

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th September, 08:59 pm
गोव्यात टॅक्सी, मोटर कॅबचे नवीन भाडेदर प्रशासनाकडून लागू

वाहतूक खात्याने राज्यातील यलो-ब्लॅक टॅक्सी, टुरिस्ट टॅक्सी, मोटर कॅब आणि मॅक्सी कॅबसाठी अंतरावर आधारित नवीन सुधारित भाडेदर अधिकृतपणे अधिसूचित केले आहेत. राज्य वाहतूक प्राधिकरणाचे सदस्य सचिव अरविंद खुटकर यांनी मोटर वाहन कायदा, १९८८ नुसार हे नवीन दर जारी केले आहेत.

दरपत्रक लावणे बंधनकारक

स्थानिक यलो-ब्लॅक आणि टुरिस्ट टॅक्सींसाठी इंजिन क्षमता आणि वाहनांच्या प्रकारानुसार हे नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व टॅक्सी परवानाधारकांना त्यांच्या वाहनांमध्ये प्रवाशांना स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी नवीन दरपत्रक लावणे बंधनकारक आहे.

टुरिस्ट टॅक्सीचे हे दर समुद्र किनारे आणि तारांकित हॉटेल परिसरात ऑपरेट करणाऱ्या टॅक्सींसाठी लागू असतील.

यलो-ब्लॅक टॅक्सीचे सुधारित दर

यलो-ब्लॅक टॅक्सीमध्ये ९९८ सीसी ते १४९९ सीसीपर्यंतच्या हॅचबॅक (उदा. वॅगनआर, आय-१०) आणि सेडान क्लासमधील (१२०० ते १४९९ सीसीच्या डिझायर, अमेझ, ब्रेझा) वाहनांसाठी ० ते ३ किमीसाठी ३०० रुपये, ३.१ ते ८ किमीसाठी ४३० रुपये, तर त्यापुढील प्रवासासाठी २६ रुपये प्रति किमी भाडे असेल.

१५०० ते २४९९ सीसीच्या क्रेटा, थार, जुनी इनोव्हा, अर्टिगा अशा वाहनांसाठी ० ते ३ किमीसाठी ४०० रुपये, ३.१ ते ८ किमीसाठी ५६० रुपये आणि त्यापुढे ३२ रुपये प्रति किमी भाडे द्यावे लागेल.

प्रीमियम यलो-ब्लॅक टॅक्सीसाठी (उदा. इनोव्हा क्रिस्टा, टक्सन) ० ते ३ किमीसाठी ५०० रुपये, ३.१ ते ८ किमीसाठी ६६० रुपये आणि त्यापुढे ३२ रुपये प्रति किमी दर असेल.

वाहन प्रकार०–३ किमी३.१–८ किमी८ किमीपुढे
९९८–१४९९ सीसी हॅचबॅक / सेडानरु. ३००रु. ४३०रु. २६ प्रति किमी
१५००–२४९९ सीसी क्रेटा / थार / जुनी इनोव्हा / अर्टिगारु. ४००रु. ५६०रु. ३२ प्रति किमी
प्रीमियम यलो-ब्लॅक टॅक्सीरु. ५००रु. ६६०रु. ३२ प्रति किमी

समुद्र किनारे, हॉटेल परिसरातील टॅक्सींसाठी वेगळे दर

समुद्र किनारे आणि तारांकित हॉटेल्सना जोडलेल्या ९९८ ते ११९९ सीसीपर्यंतच्या हॅचबॅक वाहनांसाठी ० ते ३ किमीला ३०० रुपये, ३.१ ते ८ किमीला ४४५ रुपये, तर त्यापुढे २९ रुपये प्रति किमी दर असेल.

१२०० ते १४९९ सीसीच्या स्विफ्ट, बलेनो, आय-२० वाहनांसाठी ० ते ३ किमीसाठी ३०० रुपये, ३.१ ते ८ किमीला ४८० रुपये आणि त्यापुढे ३६ रुपये प्रति किमी भाडे असेल.

१५०० ते २४९९ सीसीपर्यंतच्या इकोस्पोर्ट, थारसारख्या वाहनांसाठी ० ते ३ किमीला ४०० रुपये, ३.१ ते ८ किमीसाठी ६४५ रुपये आणि त्यापुढे ४९ रुपये प्रति किमी भाडे द्यावे लागेल.

वाहन प्रकार०–३ किमी३.१–८ किमी८ किमीपुढे
९९८–११९९ सीसी हॅचबॅकरु. ३००रु. ४४५रु. २९ प्रति किमी
१२००–१४९९ सीसी स्विफ्ट / बलेनो / आय-२०रु. ३००रु. ४८०रु. ३६ प्रति किमी
१५००–२४९९ सीसी इकोस्पोर्ट / थाररु. ४००रु. ६४५रु. ४९ प्रति किमी

प्रीमियम टुरिस्ट टॅक्सीचे भाडे

२५०० सीसीच्या वरील प्रीमियम मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी अशा टुरिस्ट टॅक्सींसाठी ० ते ३ किमीसाठी १००० रुपये, ३.१ ते ८ किमीसाठी १७४५ रुपये, तर त्यापुढे १४९ रुपये प्रति किमी भाडे निश्चित केले आहे.

रात्रीच्या प्रवासासाठी अतिरिक्त शुल्करात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत टुरिस्ट टॅक्सी वापरल्यास दर तासाला १०० रुपये अतिरिक्त शुल्क आणि मूळ दरावर ३५ टक्के अधिक आकारणी होईल.

टोल, फेरी आणि पार्किंगचा खर्च ग्राहकाकडून

टोल, फेरी शुल्क आणि पार्किंग फी ग्राहकाला स्वतः द्यावी लागेल. प्रवाशांनी शेअरिंग पद्धतीने गाडी वापरल्यास प्रति प्रवासी खर्च काढण्यासाठी मूळ दर वाहनाच्या एकूण प्रवासी क्षमतेने भागले जातील, असे राज्य वाहतूक प्राधिकरणाचे सदस्य सचिव अरविंद खुटकर यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा