पर्वरी उड्डाणपूल : विकास, श्रेय आणि वाहतुकीचा घोळ

पर्वरी उड्डाणपुलामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांतून वाहतूक सुधारली असली, तरी खराब नियोजन, अभियांत्रिकी चुका आणि राजकीय श्रेयवादाच्या शर्यतीमुळे अपघातांचा धोका व वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे.

Story: विचारचक्र |
25th September, 11:46 pm
पर्वरी उड्डाणपूल : विकास, श्रेय आणि वाहतुकीचा घोळ

पर्वरीचा उड्डाणपूल गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला  वाहतुकीला खुला झाला, की गेली तीन वर्षे आम्ही पर्वरीवासीयांनी सोसलेल्या हालअपेष्टांचे चीज होईल, या आनंदात आम्ही श्री गणरायाचे स्वागत केले. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी  दोन दिवस आधी या पुलाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन केले. दिल्लीत भाजपचे सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सत्तेवर आल्यापासून गोव्याला कधीच काही कमी पडू दिलेले नाही. गोवा आपल्याला ‘लकी’ असल्याचे त्यांना ठामपणे वाटते. २०१४ मध्ये गोव्यात भरलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड झाली आणि निवडणुकीत भरघोष यश मिळवून ते पंतप्रधान बनले, ते आजतगायत त्या पदावर कायम आहेत. आजवरचे सर्वात यशस्वी पंतप्रधान म्हणून त्यांनी नाव कमावले आहे. हे सगळे यश गोव्यामुळे घडले आहे, असे त्यांना मनोमन वाटते. त्यामुळेच आजवर गोव्याच्या विकासासाठी मागितलेली प्रत्येक गोष्ट आम्हाला मिळाली आहे.

पत्रादेवी ते पोळे हा गोव्यातील सर्वात महत्त्वाचा महामार्ग आहे. सुरुवातीच्या काळात १०५ कि.मी.चा हा मार्ग कापण्यासाठी तब्बल चार तास लागायचे. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारच्या उदारमतवादी आर्थिक धोरणांमुळे गोव्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. त्यामुळे संपूर्ण मार्गात मोठ्या  प्रमाणात सुधारणा झाली आहे. मात्र, या महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांच्या निष्काळजीपणामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच नव्हे, तर गोवा सरकारचीही नाहक बदनामी होते. आताच चालू असलेल्या पर्वरी उड्डाणपुलाच्या अवव्यस्थेमुळे  केवळ जनता व सरकारमध्येच नव्हे, तर सरकारच्या दोन मंत्र्यांमध्येच खडाजंगी उडाली. पर्वरी उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येत असल्याने शिष्टाचार संकेतानुसार  सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांना मानसन्मान मिळाला. त्यामुळे इतर मंत्री नाराज झाले. विकासकामे ही सततची प्रक्रिया असते. कोणत्याही विकासकामांचे लिखित श्रेय ज्यांनी पाया घातला आणि ज्यांनी उद्घाटन केले, त्यांनाच जातो. कारण नामफलकावर या दोघांचीच नावे कोरली जातात. कोणतेही मोठे काम पाच वर्षांत पूर्ण होणे शक्य नसते. अन् गोव्यातील अनेक प्रकल्पांची पायाभरणी मगो राजवटीत झाली होती, ते काँग्रेस राजवटीत पूर्ण झाले. गोवा विधानसभा प्रकल्पाची सुरुवात काँग्रेस राजवटीत झाली होती. उद्घाटन करण्याची संधी भाजपचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना लाभली.

पर्वरी उड्डाणपुलाचे खरे श्रेय गोव्याचे दीर्घकालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनाच जाते. ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत पत्रादेवी ते पर्वरी आणि पणजी ते वेर्णा हे उडडाणपूल तसेच पर्वरी उड्डाणपुलाच्या व्हिडिओसह तपशीलवार माहिती दिली ह़ोती. दरम्यानच्या काळात हे सगळे प्रकल्प पूर्ण झाले. सुदिन ढवळीकर यांचे आवडीचे बांधकाम खाते नीलेश काब्राल यांना गेले. एवढ्यात आलेक्स सिक्वेरा यांना मंत्री करण्यासाठी काब्राल यांना डच्चू मिळाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बांधकाम खाते आपल्याकडेच ठेवले, त्यामुळे पर्वरी पुलाचे श्रेय मुख्यमंत्र्यांनाही दिले पाहिजे. प्रत्यक्षात डॉ. सावंत हे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या कारकीर्दीत झालेल्या सर्व कामांचे सारे श्रेय त्यांनाच जाते. दिगंबर कामत यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर बांधकाम खात्याची जबाबदारी त्यांच्या अनुभवी खांद्यावर सोपविण्यात आली. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून तब्बल पाच वर्षे गोव्याचा कारभार यशस्वीपणे हाताळणारे कामत यांनी या कामाचा सतत पाठपुरावा करून निर्धारित मुदतीत काम पूर्ण करून धुमधडाक्यात उद्घाटनाचा बार उडवला. अर्थात वेळेवर काम पूर्ण करण्याचे श्रेय कर्तबगार कंत्राटदाराला दिलेच पाहिजे. एवढया मोठ्या  थाटामाटात उद्घाटन सोहळा झाल्यानंतर पुलावर झालेल्या एका अपघातात दोन बळी गेल्याने ‘हेचि फळ काय मम तपाला?’ असे अपराधी भावनेने म्हणण्याची पाळी सरकारवर आली.

नवा पूल वाहतुकीला खुला होणार म्हणजे वाहतूक सुरळीत चालू ठेवण्यासाठी योग्य ते नियोजन करणे ही वाहतूक पोलिसांची घटनादत्त जबाबदारी होती. नवा उड्डाण पूल सहापदरी असल्याने जिथे हा पूल मुख्य रस्त्याला जोडला जाणार, तेथे वाहतुकीत गोंधळ होऊ शकतो याची कल्पना वाहतूक पोलिसांना नव्हती का? होती, तर त्यावर कोणती उपाययोजना केली होती?  वाहतूक पोलिसांनी आपले काम व्यवस्थितपणे केले असते, तर मॅजेस्टिक कॅसिनोसमोर जे दोघांचे बळी गेले ते टळले असते. हा एक अपघात घडल्यानंतर सरकारने जी उपाययोजना केली, तो मूर्खपणाचा कळस होता. स्थानिक आमदार रोहन खंवटे यांना विश्वासात घेतले असते, तर त्यांनी नक्कीच अधिक चांगला पर्याय सुचविला असता!

पर्वरी उड्डाणपूल पर्वरीवासीयांसाठी बंद ठेवल्याने  मेरशी नाक्यावर वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. मेरशीहून पणजीला पोहोचायला किमान अर्धा तास वाया जातो.

गोव्यातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी गेल्या २० वर्षांत २० हजार कोटी खर्च करण्यात आले आहेत. पण आज वाहतुकीचा जो घोळ चालू आहे, ते पाहिल्यास हा सारा पैसा पाण्यात गेला असे म्हणावे लागते. गोवाभर जे नवे रस्ते बांधण्यात आले, त्यामुळे नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या दूर करण्यासाठी म्हापशात पेडे येथे, पेडणे तालुक्यात धारगळमध्ये पोरसकडे येथे नवे उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. या नव्या उड्डाणपुलांचे काम एवढ्या संथ गतीने चालले आहे की ते कधी पूर्ण होणार हे सांगणे कठीण आहे.

आगशी-कुठ्ठाळी उड्डाणपूल वेर्णा पठारावर पोहोचला आहे. हा पूल सुरक्षित आहे. मात्र नुवे भागातील मार्ग सद़ोष आहे. या परिसरात किती अपघात झाले, किती बळी घेतले आणि किती  वाहनांचे नुकसान झाले, याची नोंदही नाही.

पणजी - बेळगावी महामार्गाचा भाग असलेल्या चिंबल नाक्यावर असेच किती भीषण अपघात घडले आणि किती निष्पाप लोकांचे बळी गेले, याची गणती नाही. कदंब पठारावरील रस्ता असाच सदोष ठरल्याने आडवा ओव्हरब्रीज बांधून चूक सुधारण्यात आली. मात्र ही चूक सुधारण्यासाठी कोट्यवधींचा चुराडा झाला. रस्त्यांची आखणी करताना सरकारी अभियंते किंवा सल्लागारांनी आपल्या इंजीनियरिंग ज्ञानाचा योग्य वापर केला असता, तर म्हापसा ते पोरसकडे या २० कि.मी. लांबीच्या मार्गावर चार नवे ओव्हरब्रीज बांधण्याची गरजच भासली नसती. वातानुकूलित कार्यालयात बसून महामार्गाचे आराखडे तयार केले, की असाच गोंधळ नक्कीच  होणार! 

पणजी-बेळगांवी महामार्गाचा आराखडा तयार   करण्याचे काम सध्या चालू आहे. भोम परिसरातील वादावर सर्वमान्य तोडगा निघण्याची चिन्हे दिसत नाहीत. चोडण-बिठ्ठोण पूल व रस्त्याची आखणी करताना पुढील ५० वर्षांची गरज विचारात घेतली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्या सर्व अभियंत्यांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यासाठी गोवा सरकारने आपल्या निवडक अभियंत्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत.