ग्राहकांना 'अॅनालॉग'ची माहिती देणे गरजेचेच

नियम लागू करून आणि व्यापाऱ्यांना समजावून सांगूनही ग्राहकांची फसवणूक होऊ लागली, तर सरकारने कठोर उपाय करण्याची गरज आहे. पनीर, चीज, मावा, मिठाई हे शुद्ध दुधाच्या पदार्थांच्या नावाखाली 'अॅनालॉग' वापरून केले जात असतील तर अशा लोकांवर कठोर कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपास पथकांची स्थापनाही करणे गरजेचे आहे.

Story: संपादकीय |
11 hours ago
ग्राहकांना 'अॅनालॉग'ची माहिती देणे गरजेचेच

दुधासारखे दिसणारे पर्यायी अर्थात कृत्रिम पदार्थ वापरून ते हुबेहुब दुधाचे पदार्थ दिसणारे चीज, पनीर विकले जातात. त्यात दुधातील फॅटच्या जागी वनस्पतीजन्य फॅट वापरले जातात. अर्थात हेच ‘मिल्क अॅनालॉग’ असतात. ते वापरून ग्राहकांची खरे दुधाचे पदार्थ म्हणून सर्रास फसवणूक होत असते. दूध, पनीर, चीज, मावा यांसारख्या पदार्थांत त्यांचा वापर केला जातो, त्यामुळे ग्राहकांना त्याचे दुष्परिणामही भोगावे लागतात. मात्र गोव्यात कुठेच कधी व्यापारी आपण यात ‘मिल्क अॅनालॉग’चा वापर केला आहे, हे सांगत नाहीत. त्यामुळे ग्राहकांनाही त्याची कल्पना येत नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात रेस्टॉरंटमध्ये हल्ली पदार्थांमध्ये चीज किंवा पनीर अॅनालॉगचा वापर होत नाही, असे फलकच झळकत आहेत. ग्राहकांच्या हितासाठी कुठल्या गोष्टींचा वापर पदार्थांमध्ये होत आहे ते कळणे आवश्यक आहे. गोव्याच्या अन्न व औषध प्रशासनाने याविषयी उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. आरोग्य सचिव यतिंद्र मराळकर यांनी याविषयी गेल्या आठवड्यात नियमावली जारी केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन खात्याने व्यापाऱ्यांची घेऊन सर्वांना तंबी दिली आहे. मिल्क अॅनालॉगचा वापर होत असेल, तर त्याबाबतची माहिती देणे सक्तीचे केले आहे. सोबतच काही निर्देश दिले आहेत, ज्यामुळे यापुढे सर्वच व्यापाऱ्यांना मिल्क अॅनालॉगचा वापर होत असल्यास त्याची माहिती ग्राहकांना द्यावी लागेल. तसे न केल्यास खात्याने कारवाई करण्याचाही इशारा दिला आहे. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. मिल्क अॅनालॉगचा वापर म्हणजेच दुधाव्यतिरिक्त घटकांचा, अर्थात वनस्पतीजन्य फॅटचा वापर करून तयार केलेला पदार्थ. पनीर, चीजसारखेच दिसणारे किंवा त्याच प्रकारची चव असलेले वनस्पतीजन्य फॅट, प्रथिने वापरलेले पर्यायी पदार्थ म्हणजेच ‘मिल्क अॅनालॉग’. सध्या अनेक कंपन्यांनी प्रक्रिया केलेले चीज अॅनालॉग बाजारात उपलब्ध केले आहेत. मात्र मिठाई उत्पादक, मिठाई विक्रेते, हॉटेल्स-रेस्टॉरंट्स, केटरर्स यांच्याकडून या गोष्टी अॅनालॉग म्हणून विकल्याचे कोणी सांगू शकणार नाही कारण त्यांच्याकडून ग्राहकांना हे खरे चीज, खरे पनीर म्हणूनच विकले जाते. 

मुळात बहुतेक जण स्वस्त असल्यामुळे अॅनालॉगचा वापर करतात. हा खरे तर ग्राहकांना फसविण्याचा प्रकार आहे. अचानक देशभर चीज अॅनालॉगच्या वापराबाबत तक्रारी आल्यामुळे आता अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएआय) देशभर एकसमान व्यवस्था तयार करण्याचा विचार करत आहे. दिल्लीत सर्व राज्यांच्या प्रतिनिधींची एक बैठक होत आहे. अॅनालॉग पनीर, अॅनालॉग चीजवर देशव्यापी बंदी घालण्याबाबतही केंद्र सरकार विचार करत आहे. त्यामुळे गोव्यात अन्न आणि औषध प्रशासनाने सध्या जी दक्षता घेतली आहे, ती गरजेचीच आहे. त्यातून अशा अॅनालॉग चीज, पनीरचा आणि अन्य मिल्क अॅनालॉगचा वापर करत असलेले व्यापारी धडा घेतील अशी अपेक्षा आहे.

गोव्याच्या अन्न व औषध प्रशासनाने व्यापाऱ्यांनी ‘मिल्क अॅनालॉग’चा वापर करून पदार्थ बनवले असतील तर तसा फलक दुकान, रेस्टॉरंट किंवा आवश्यक त्या जागी लावणे, मेन्यूकार्ड आणि काऊंटरवर माहिती देण्याची सक्ती केली आहे. विशेष म्हणजे अॅनालॉग पदार्थांपासून तयार केलेले पदार्थ दुधाचे पदार्थ म्हणून विकता येणार नाहीत. बिलावरही तसे नमूद करावे लागेल. त्यामुळे एका अर्थाने हे मोठे पाऊलच सरकारने उचलले आहे. सध्या व्यापाऱ्यांना या गोष्टींची कल्पना दिली आहे. सांगूनही व्यापाऱ्यांनी ऐकले नाही, तर कारवाईचा मार्ग खुला आहे. जर हे नियम मोडून कोणी अॅनालॉग पदार्थ दुधाच्या पदार्थांच्या नावाखाली विकू लागले, तर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी त्यांच्यावर थेट कारवाई करू शकतात. त्यासाठी नियमही तयार केले आहेत. ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल अशा प्रकारची कृती यापुढे व्यापाऱ्यांनी करू नये, असे सरकारला अपेक्षित आहे. नियम लागू करून आणि व्यापाऱ्यांना समजावून सांगूनही ग्राहकांची फसवणूक होऊ लागली, तर सरकारने कठोर उपाय करण्याची गरज आहे. पनीर, चीज, मावा, मिठाई हे शुद्ध दुधाच्या पदार्थांच्या नावाखाली अॅनालॉग वापरून केले जात असतील तर अशा लोकांवर कठोर कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपास पथकांची स्थापनाही करणे गरजेचे आहे.