नवतंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत विद्यार्थी वैचारिकदृष्ट्या सक्षम कसा होईल याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबतचे नैतिक आणि सामाजिक भान न आल्यास मानवी प्रज्ञाच 'कृत्रिम' होण्यास वेळ लागणार नाही.
जगभरातील किशोरांमध्ये पुस्तके वाचण्याची आणि शिकण्याची क्षमता सातत्याने कमकुवत होत असल्याचे एका ताज्या आंतरराष्ट्रीय अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. अभ्यासाऐवजी डिजिटल उपकरणांवर वाढणारा वेळ व पुस्तकांबाबत कमी होत असलेली रुची हे यामागील मुख्य कारण आहे. आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेच्या (ओईसीडी) ताज्या अभ्यासानुसार, १५ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांची वाचन, गणित आणि विज्ञान विषयांमधील कामगिरी या शतकातील सर्वांत खालच्या स्तरावर पोहोचली आहे. या आंतरराष्ट्रीय मूल्यमापन चाचणीत ९१ देशांमधील सुमारे ७.६० लाख विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यात आला होता.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) गैरवापराची चिंता व्यक्त होत असतानाच एआय विकासाचा वेग कमी करणे आवश्यक आहे, अन्यथा या प्रणालींवरील मानवी नियंत्रण गमावण्याचा धोका आहे, असा इशारा ‘अँथ्रोपिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डारिओ अमोदेई यांनी नुकताच दिला. एआय उद्योगाने विकासाचा वेग कमी करण्यासाठी पावले उचलावीत, अशी भूमिका मांडताना स्वतःच्या कंपनीच्या सुरक्षा उपायांची पडताळणी करण्यासाठी बाह्य निरीक्षकांना कर्मचाऱ्यांइतकाच थेट आणि कायमस्वरूपी प्रवेश देण्याची घोषणाही अँथ्रोपिकने केली आहे. अमोदेई यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे एआय विकासाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन टप्प्यांची योजना मांडली. बाह्य निरीक्षकांना आपल्या प्रणालींचा कायमस्वरूपी प्रवेश देणे,
हे त्यातील पहिले पाऊल अँथ्रोपिक उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. या बाह्य निरीक्षकांना कंपनीच्या सुरक्षा उपायांचे पालन होत आहे की नाही, घटनांची नोंद, एआय मॉडेल्सचे मानवी मूल्यांशी सुसंगतता तपासता येईल. पुढील पाच ते दहा वर्षांत एआयच्या मदतीने अनेक प्रमुख आजारांवर उपचार शक्य होतील, आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल, तसेच लोकशाही आणि स्वातंत्र्याला नवी चालना मिळू शकते, असे त्यांनी म्हटले. मात्र, एआयच्या क्षमतेसोबत त्याचे गंभीर धोकेही आहेत. स्वतःचीच पिढी घडवण्याची क्षमता एआय मॉडेल्सच्या क्षमतेत वेगाने वाढ होत असून, एआयला पुढील पिढीतील एआय विकसित करण्याची क्षमता मिळत असल्यामुळे हा वेग आणखी वाढत आहे, असे अमोदेई यांनी म्हटले.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान हे दिवसेंदिवस संशोधनाचे नवनवीन टप्पे गाठत आहे. संशोधकांनी आता मानवी पॅथॉलॉजिस्टच्या विचार प्रक्रियेचे अनुकरण करू शकणारे ‘एआय’ मॉडेल तयार केले आहे. हे ‘एआय’ तंत्रज्ञान कर्करोगाचे निदान अधिक अचूक आणि जलद गतीने करण्यास मदत करणार आहे. सामान्यतः कर्करोगाच्या निदानासाठी पॅथॉलॉजिस्ट मायक्रोस्कोपखाली ट्यूमरच्या ऊतींच्या पेशींची सखोल तपासणी करतात. या प्रक्रियेत वैद्यकीय तज्ज्ञ केवळ प्रतिमा पाहत नाहीत, तर त्यांच्या वर्षांच्या अनुभवाच्या आधारे विशिष्ट नमुन्यांचे विश्लेषण करून निष्कर्ष काढतात. वैज्ञानिक आता प्रतिमेतील पेशीतज्ज्ञ डॉक्टरांप्रमाणे ‘तार्किक विश्लेषण’ करण्याचे प्रशिक्षण देण्याऱ्या एआय सिस्टमवर काम करत आहेत. याचा अर्थ, निरीक्षण आणि विश्लेषणासोबतच युद्धापासून तर आपल्या जीवनातील भावभावनांपर्यंत प्रत्येक गोष्टीत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञान हस्तक्षेप करीत आहे.
८२.२% भारतीय मुले स्मार्टफोन वापरतात, तर दिवसाला सरासरी तीन तास भारतीय मुले मोबाईल पाहतात, असा अहवाल असतानाच अमेरिकेतील सर्वात मोठ्या शिक्षण प्रणालीपैकी एक असलेल्या न्यूयॉर्क शहराने मुलांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरावर आणि स्क्रीन टाइमवर कठोर निर्बंध लादले आहेत.
भारत मात्र सोशल मीडियाचे व्यसन अधिक वाढत असलेल्या देशांपैकी एक आहे. सध्या भारतात शाळा किंवा मुलांसाठी एआय आणि स्क्रीन टाइमच्या वापराबाबत कोणतेही ठोस धोरण नाही, परंतु येथील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. अहवालानुसार, १४ ते १६ वयोगटातील ८२.२% मुलांना स्मार्टफोन कसा वापरायचा हे माहित आहे. तथापि, या मुलांपैकी निम्म्याहून थोडे अधिक मुलेच अभ्यासासाठी फोन वापरतात, तर बहुसंख्य मुले केवळ मनोरंजनासाठी फोन वापरतात. शहरी भारतातील जवळपास ५० टक्के मुले दररोज तीन तासांपेक्षा जास्त वेळ सोशल मीडिया, व्हिडिओ आणि गेमिंगवर घालवतात.
याउलट, न्यूयॉर्क प्रशासनाचा निर्णय केवळ उपकरणे बंद करण्यापुरता मर्यादित नाही, तर शैक्षणिक अँप्समध्ये लपवलेल्या एआय वैशिष्ट्यांवर आणि चॅटवॉट्सवरही बंदी घालणारा आहे. विद्यार्थ्यांजवळील वैयक्तिक डिजिटल उपकरणे काढून टाकली जात असतानाच माध्यमिक शाळा (सहावी ते आठवी इयत्ता) दररोज फक्त ४५ मिनिटांचा स्क्रीन टाइम दिला जाईल. तर उच्च माध्यमिक विद्यार्थाना फक्त चाचणी केलेल्या एआय साधनांचा मर्यादित वापर करण्याची परवानगी दिली जाईल.
२०२० नंतरच्या काळात वेगाने वाढलेल्या नवतंत्रज्ञानाच्या साधनांमुळे भारतीय विद्यार्थी वैचारिक दृष्ट्या प्रगत झाला की सामाजिक दृष्ट्या असंवेदनशील झाला, याचे उत्तर भारतीय समाजाला शोधावे लागणार आहे. कोणतेही नवतंत्रज्ञान स्वीकारत असताना त्याचे भविष्यकालीन फायदे-तोटे समजून घेणे गरजेचे असते. अन्यथा तो विचार स्वीकारणे ही केवळ आंधळेपणाची कृती ठरते. नवतंत्रज्ञानाने भारतीय समाजातील प्रत्येक व्यक्तीला केवळ ग्राहक बनविले आहे. फोन मधील रिचार्ज ही जीवनावश्यक वस्तू बनली असताना त्याद्वारे अभ्यास करण्याचे नैतिक भान बहुतेक विद्यार्थ्यांना आलेले नाही. प्रश्न नवतंत्रज्ञानाच्या वापराचा नाही, तर ते तंत्रज्ञान वापरण्यामागे नीतीभान देण्याचे आहे. आपल्या समाजात विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्रे, साहित्य, भाषा इतकेच नव्हे तर, रस्ता सुरक्षा, प्रवास जागरूकता, मदत व सहकार्य याबाबत सुद्धा उदासीन दृष्टिकोन असताना नवतंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वादळाचा बौद्धिक आणि नैतिक सामना आपले विद्यार्थी कसे करतील, हा प्रश्न आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महिलांचे विकृत व्हिडिओ, फोटो तयार करणाऱ्या घटकांची प्रवृत्ती कशी घालवणार किंवा ऑनलाईन फसवणुकीच्या घटना कशा टाळणार? त्यासाठी नवतंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत विद्यार्थी वैचारिकदृष्ट्या सक्षम कसा होईल याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबतचे नैतिक आणि सामाजिक भान न आल्यास मानवी प्रज्ञाच ‘कृत्रिम’ होण्यास वेळ लागणार नाही.



