काँग्रेसने गोव्याच्या संवर्धनासाठी निवडणुकीच्या तोंडावर 'गोवा राखण यात्रा' सुरू केली. २०२२ मध्ये राष्ट्रीय स्तरावर ‘भारत जोडो यात्रा’ सुरू केल्यानंतर कर्नाटक, तेलंगणासारख्या राज्यांत आणि हल्ली केरळमध्येही या यात्रेचा प्रभाव आणि परिणाम काँग्रेससाठी सकारात्मक दिसला होता. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र म्हणावे तसे यश काँग्रेसला आले नाही. निवडणुकीचा हेतू समोर ठेवूनच ‘भारत जोडो यात्रा’ आयोजित केली होती. त्यासाठी राहुल गांधी यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्याचे सकारात्मक परिणाम आजही काँग्रेसला दिसत आहेत. केंद्रात सत्ता मिळाली नसली तरी काँग्रेसबद्दल देशभरात एक सकारात्मक जनमत तयार होऊ लागले. मात्र, दुर्दैवाने त्या काळातही गोव्यात ‘काँग्रेस फोडो’ ही भाजपची मोहीम यशस्वी झाली. काँग्रेसने भारत जोडो यात्रेची घोषणा केली, त्याच दरम्यान गोव्यात सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये दाखल झाले. भारत जोडो यात्रेला तो मोठा अपशकून होता. त्यानंतर काँग्रेसने भाजपला विरोध करण्यासाठी गोव्यात फार काही केले नाही, पण वेळोवेळी लोकांच्या आंदोलनांना त्यांनी केवळ पाठिंबा दर्शविला. गेल्या काही वर्षांमध्ये गोव्यात भाजप सरकारच्या काळात जमीन रूपांतरण आणि जमीन विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत, मात्र त्यावर काँग्रेसचे मौनच असते. अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या जमिनी रूपांतरित करून घेतल्या. काँग्रेसच्या काही नेत्यांनीही यात हात धुऊन घेतले. गोव्याच्या संरक्षणासाठी खरे म्हणजे याआधीच मोहीम सुरू व्हायला हवी होती. पण ते सोडून आता गोवा राखण यात्रेचे सोंग काँग्रेसकडून होत आहे. गोवा संपविण्याचे कारस्थान सुरू असताना काँग्रेसला हे सुचले नाही. त्या काळात काँग्रेस एकमेकांना शह देण्यासाठी व्यस्त होती. आता निवडणूक जवळ पोहोचल्यानंतर गोवा राखण यात्रेचे नाटक केले जात असले तरी कुठल्या गोव्याची राखण त्यांना करायची आहे, ते मात्र काँग्रेस सांगत नाही. लाखो चौरस मीटर जमीन रूपांतरित केली गेली. हजारो जमीन व्यवहार झाले. जमिनीचे दर गगनाला भिडले. मूळ गोवेकर आज तीनशे चौरस मीटरचा भूखंडही खरेदी करू शकत नाहीत. परप्रांतीयांनी इथल्या जमिनींसोबतच मोठ्या प्रमाणात फ्लॅट्सही खरेदी केले आहेत. गोव्याचे संरक्षण करण्यात आपण सारेच अपयशी ठरलो आहोत, अशा वेळी काँग्रेसची ‘गोवा राखण यात्रा’ कितपत यशस्वी होईल, ते पहावे लागेल.
काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण इतके वाढीस लागले आहे की सध्या खरी गरज आहे ती काँग्रेस राखण यात्रेची. काँग्रेसला अद्यापही निवडणुकीचा सूर गवसलेला नाही. सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात काँग्रेसला यश आलेले नाही. गोवा फॉरवर्ड पक्ष असो किंवा अमित पाटकर यांच्यासारखे नेते असो, आज ते काँग्रेसच्या मुख्य धारेत नाहीत. काँग्रेसने आपला पक्ष एका समाजापुरता मर्यादित ठेवण्याचे धोरण आखले असेल तर काँग्रेसला कोणीच वाचवू शकत नाही. आज गरज आहे ती सर्व विरोधकांना काँग्रेसने एकत्र आणण्याची. त्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेण्याची गरज आहे. इतर लहान पक्ष त्यासाठी पुढाकार घेणार नाहीत. आम आदमी पक्ष काँग्रेससोबत येत नसेल तर एकवेळ त्यांना वेगळे ठेवता येईल, पण आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांना सोबत घेणे काँग्रेसच्याच फायद्याचे आहे. अन्यथा काँग्रेस आपलेही नुकसान करून घेईल आणि जे पक्ष काँग्रेसशिवाय स्वतंत्रपणे लढू पाहतील, त्यांनाही धक्का बसणार आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तरच त्याचा लाभ सर्वांना मिळेल.
निवडणूक तोंडावर आल्यामुळे काँग्रेसने आधी पक्ष बांधणीकडे लक्ष द्यायला हवे. विरोधकांना एकत्र आणून सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी रणनीती आखायला हवी. या सगळ्या गोष्टींपासून काँग्रेस बरीच दूर आहे. मात्र, गोवा राखण यात्रा काढून त्यात वेळ खर्च करण्यात काँग्रेसला धन्यता वाटते. ही यात्रा तीन-चार महिन्यांपूर्वी व्हायला हवी होती. आता निवडणुकीची तयारी करायची असताना या नको त्या उचापती काँग्रेस करत आहे, त्यातून काही साध्य होईल असे दिसत नाही. गोवा विकताना सर्वांनी डोळे उघडून बघ्याची भूमिका घेतली आणि आता गोव्याच्या संरक्षणासाठी गोवा राखण यात्रेचा खटाटोप केला जात आहे. ही यात्रा काँग्रेसला तारते की बुडवते, ते निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल.


