स्पीड कॅमेऱ्यांमुळे पर्वरी उड्डाणपुलावरील अतिवेगाच्या ५८० घटना उघडकीस

पर्वरी उड्डाणपुलावर १० दिवसांत ५८० वाहनांनी ६५ किमी वेगमर्यादा ओलांडल्याचे स्पीड कॅमेऱ्यांद्वारे स्पष्ट झाले असून, वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ई-चलानद्वारे कडक कारवाई सुरू केली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
13 mins ago
स्पीड कॅमेऱ्यांमुळे पर्वरी उड्डाणपुलावरील अतिवेगाच्या ५८० घटना उघडकीस

पणजी : पर्वरी येथील नवीन उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे बसवल्यानंतरच्या अवघ्या १० दिवसांत ५८० वाहनांनी ताशी ६५ किलोमीटरची वेगमर्यादा ओलांडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मार्गावर वारंवार होणारे प्राणघातक अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करूनही वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन सुरूच असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.  

 हा उड्डाणपुल ११ सप्टेंबर रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यापासून आतापर्यंत येथे चार अपघात झाले आहेत. यात १३ सप्टेंबर रोजी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर इतर तीन अपघातांची नोंद झाली असली, तरी सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या उड्डाणपुलावर शुक्रवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास एक क्रेटा कार दुभाजकाला जाऊन धडकली. यात कारचे अंशतः नुकसान झाले असून प्रवासी सुरक्षित राहिले. 

 पहिल्या अपघातानंतर सार्वजनिक बांधकाम खाते, वाहतूक खाते आणि वाहतूक पोलिसांच्या पथकाने उड्डाणपुलाची संयुक्त पाहणी केली होती. या पाहणीनंतर १५ सप्टेंबर रोजी पुलावर दोन स्पीड कॅमेरे बसवण्यात आले आणि त्यानंतर अटल सेतूवरून पर्वरीच्या दिशेने उतरणाऱ्या मार्गावर तिसरा कॅमेरा तैनात करण्यात आला. हे कॅमेरे बसवल्यापासून ते २५ सप्टेंबरपर्यंत ५८० वाहने अतिवेगाने जात असताना कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. नियम मोडणाऱ्या वाहन मालकांना एसएमएसद्वारे सूचित केले जात असून त्यांना ई-चलान जारी करून दंडात्मक कारवाई केली जात आहे.  

 वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पीड कॅमेऱ्यांच्या मदतीने आता या मार्गावरील वाहनांच्या वेगावर आणि नियमभंगावर बारीक लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. पुलावर पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करूनही वाहनचालक वेगमर्यादेचे पालन करत नसल्याबद्दल प्रशासनाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांनी स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेसाठी निर्धारित वेगमर्यादेचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.   

हेही वाचा
सर्व पहा