कोरगाव: गोवा राज्य अग्निशमन सेवेत प्रदीर्घकाळ सेवा बजावणारे अधिकारी प्रशांत घनश्याम धारगळकर आज सेवेतून निवृत्त होत आहेत. १९८८ साली रोजंदारीवर फायर फायटर म्हणून अग्निशमन सेवेत दाखल झालेल्या धारगळकर यांनी आपल्या सेवाकाळात धाडस, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीची वेगळी ओळख निर्माण केली.
प्रशांत धारगळकर यांनी सुरुवातीची दोन वर्षे रोजंदारीवर फायर फायटर म्हणून काम केले. त्यानंतर डिचोली, जुने गोवे, पणजी, फोंडा, राजभवन, पेडणे आणि वळपोई आदी ठिकाणी त्यांनी सेवा बजावली. सरकारी नोकरी ही केवळ ड्युटीपुरती मर्यादित न ठेवता संकटात सापडलेल्या नागरिकांना वेळेचे भान न ठेवता मदत करणे, हे त्यांनी आपले कर्तव्य मानले.
२००६ मध्ये खांडोळ-माशेल येथे एका खोल विहिरीत एका मुलीने आत्महत्येच्या उद्देशाने उडी मारली होती. बचावकार्यादरम्यान प्रशांत धारगळकर यांना विषारी सापाचाही सामना करावा लागला. तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या मुलीला सुरक्षित बाहेर काढले. या धाडसी कार्याची दखल घेत त्यांना मुख्यमंत्री शौर्य पुरस्कार व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
२०१७ मध्ये मुंबईहून पेडणेमार्गे म्हापसाकडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या केबिनमधून धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी वाहनाचा पाठलाग करून ते थांबवले, प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवले आणि आग विझवली. त्याचप्रमाणे पेडणे येथे एसटी वाहनाची वीज खांबाला धडक होऊन वीजप्रवाह सुरू असताना त्यांनी प्रसंगावधान राखत वीज विभागाला माहिती देऊन पुढील अनर्थ टाळण्यासाठी मदत केली.
तोरसे येथे राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची आंब्याच्या झाडाला धडक होऊन तो शेजारील दुकानात घुसला होता. चालक केबिनमध्ये अडकला होता. मध्यरात्रीच्या वेळी सहकार्याची फारशी मदत उपलब्ध नसतानाही धारगळकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सुमारे दोन तास प्रयत्न करून चालकाला सुखरूप बाहेर काढले. मालपे उतरणीवर झालेल्या चार वाहनांच्या अपघातात कंटेनर उलटून त्याच्या केबिनमध्ये राजस्थानमधील युवक अडकला होता. त्यालाही धारगळकर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढले.
वाळपई येथे घरगुती गॅस सिलिंडरला आग लागल्याच्या घटनेतही त्यांनी जीवाची पर्वा न करता सहकाऱ्यांसह परिस्थिती नियंत्रणात आणली. अलीकडेच कोलवाळ येथे कंटेनरला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात दारूचा साठा असल्याचे समोर आले होते. या कारवाईतही धारगळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या धाडसी आणि उत्कृष्ट सेवांची दखल घेत त्यांना मुख्यमंत्री सुवर्ण पुरस्कारासह विविध सन्मान मिळाले. तसेच २०२२ मध्ये राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदकाने त्यांचा गौरव करण्यात आला.
अग्निशमन सेवेसोबतच प्रशांत धारगळकर यांची राष्ट्रीय कबड्डीपटू म्हणूनही विशेष ओळख आहे.


