मडगाव : राज्यात आतापर्यंत २२ ठिकाणी झालेल्या कर्करोग तपासणी शिबिरांमध्ये २० रुग्णांना कर्करोगाचे निदान झाले असून, ९६ रुग्णांमध्ये कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे आढळली आहेत. या सर्व रुग्णांवर वेळेत मोफत उपचार करण्यात आले आहेत. बदललेली जीवनशैली आणि बाहेरील खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे कर्करोगाचा धोका वाढत असून सर्वांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन नोडल अधिकारी डॉ. जगदीश काकोडकर यांनी केले आहे. कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नसली तरीही नागरिकांनी या वैद्यकीय शिबिरांचा लाभ घेऊन तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
नावेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि दंतचिकित्सा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी स्थानिक आमदार उल्हास तुयेकर, कर्करोग तपासणी अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. जगदीश काकोडकर, डॉ. अमिता कामत आणि डॉ. मारिया रिबेलो यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना डॉ. काकोडकर यांनी सांगितले की, या शिबिरांमध्ये ज्यांना कर्करोग किंवा त्याची सुरुवातीची लक्षणे आढळून आली, त्यांच्यावर शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन तसेच दंतचिकित्सा महाविद्यालयात राज्य सरकार आणि आरोग्य विभागामार्फत पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले आहेत. ९६ रुग्णांमध्ये कर्करोगाची प्राथमिक लक्षणे दिसून आली, ज्यामध्ये सर्वाधिक रुग्ण तोंडाच्या कर्करोगाचे होते. याशिवाय स्तनाचा आणि गर्भपिशवीचा कर्करोग झालेले रुग्णही आढळले आहेत. आतापर्यंत या अभियानांतर्गत ११६ रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. ग्रामीण भाग आणि आरोग्य केंद्रांच्या परिसरात अशा शिबिरांवर विशेष भर दिला जात असून, एका ठिकाणी शिबिर झाल्यानंतर ते दुसऱ्या भागात आयोजित केले जाते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या संधीचा आवर्जून लाभ घ्यावा.
तसेच, शरीरात दीर्घकाळ लक्षणे न दाखवता राहणारा हा आजार शेवटी गंभीर रूप धारण करतो. त्यामुळे छातीत दुखणे, रक्तस्त्राव होणे, शरीरावर कोणतीही गाठ किंवा सूज येणे, काखेत किंवा मानेत वेदना होणे अथवा पचनक्रिया बिघडणे अशी कोणतीही तक्रार असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मुलांमध्ये फास्टफूड आणि ऑनलाईन मागवलेल्या तळलेल्या अन्नपदार्थांऐवजी घरच्या ताज्या अन्नाची सवय लावावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
डॉ. अमिता कामत यांनी स्पष्ट केले की, तोंडाचा कर्करोग होण्यापूर्वी दोन वर्षे आधी तोंडाच्या आत पांढरे डाग किंवा अल्सर अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे दुर्लक्षित न करता वर्षातून एकदा तरी शरीराची पूर्ण तपासणी करून घेतली पाहिजे. आमदार उल्हास तुयेकर यांनी सांगितले की, राज्य सरकारने ३ कोटी रुपये खर्चाची अत्याधुनिक मोबाईल व्हॅन या तपासणीसाठी उपलब्ध करून दिली असून, संपूर्ण देशात केवळ लखनऊ आणि गोव्यातच अशी अद्ययावत सुविधा उपलब्ध आहे.


