पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना फोंडा मतदारसंघात राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. फोंड्यातील राजकीय परिस्थिती, भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (MGP) या जागेवर केलेल्या दाव्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले.
दामू नाईक यांनी सांगितले की, भाजप ही एक अत्यंत पद्धतशीर आणि शिस्तबद्ध पद्धतीने कार्य करणारी संघटना आहे. पक्षाचे कार्यकर्ते तळागाळात एकजुटीने काम करत असल्याने फोंड्यामध्ये तसेच संपूर्ण गोव्यात पक्षाला सातत्याने यश मिळाले आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने अनेक जनकल्याणकारी निर्णय घेतले आहेत. जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत गॅस सिलिंडर योजना तसेच महिलांसाठीच्या विविध योजना तळागाळातील घटकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचवण्याचे काम सरकारने केले आहे.
राजकारणात विरोधी पक्षांकडून विविध प्रकारच्या चर्चा आणि चुकीचे नरेटिव्ह पसरवले जात असले, तरी भाजप कार्यकर्त्यांचे कार्य अविरतपणे सुरूच राहते, असे ते म्हणाले. फोंड्याच्या जागेवर मगोपाने केलेल्या दाव्यावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, आजच्या राजकीय परिस्थितीत युती ही काळाची गरज आहे. युतीचे स्वतःचे काही विशिष्ट नियम आणि धर्म असतात. त्यामुळे या जागेबाबत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व, राज्यातील वरिष्ठ नेते आणि घटक पक्षांचे प्रमुख एकत्र बसून योग्य तो मार्ग काढतील. सर्व प्रश्न समन्वयाने आणि सामंजस्याने सोडवले जातील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दुसरीकडे, गेले दहा महिने आमदाराविना असलेल्या फोंडा मतदारसंघात सध्या आमदारकीसाठी सर्वच पक्षांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. रवी नाईक यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यावेळी भाजपचे उमेदवार रितेश नाईक आणि काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांच्यात मुख्य लढत रंगली होती. मात्र, ऐनवेळी ही निवडणूक रद्द करण्यात आली आणि टपाली मतदानाची आकडेवारी गुलदस्त्यातच राहिली. यानंतर काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांचेही दुर्दैवी निधन झाल्याने फोंड्याचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले.
सध्या काँग्रेसतर्फे राजेश वेरेकर यांनी आपली उमेदवारी निश्चित मानून मतदारसंघात कामाला सुरुवात केली आहे. तर भाजपमध्ये रितेश नाईक आणि विश्वनाथ ऊर्फ अपूर्व दळवी हे दावेदार रिंगणात असून दोघांचाही प्रचार जोरात सुरू आहे. मात्र, या दोघांपैकी एकाला उमेदवारी दिल्यास पक्षात बंडाळी होण्याची शक्यता असल्याने भाजप नेत्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. विरोधी पक्षांची युती न झाल्यास आम आदमी पक्षाकडून गितेश नाईक निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तसेच मगो पक्षाने फोंड्यात आपले कार्यालय सुरू करून आव्हान उभे केले असून, भाजपशी युती न झाल्यास मगोप स्वतंत्र उमेदवार उभा करण्याची चिन्हे आहेत. फोंडा आणि कुर्टी-खांडेपार परिसरातील एकूण ३२ हजार मतदार आगामी निवडणुकीत फोंड्याचा नवा आमदार ठरवतील.


