गोवा गृहनिर्माण मंडळातर्फे साखळी, थिवीतील भूखंडांचा ई-लिलाव

गोवा गृहनिर्माण मंडळाने साखळी आणि थिवी येथे भूखंड लिलाव जाहीर केला असून, बाजारभावापेक्षा कमी मूळ दर असला तरी लिलावात उतरण्यासाठी १ ते ३ कोटी रुपयांची अनामत रक्कम अनिवार्य केली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
10 mins ago
गोवा गृहनिर्माण मंडळातर्फे साखळी, थिवीतील भूखंडांचा ई-लिलाव

पणजी : गोवा गृहनिर्माण मंडळाने (Goa Housing Board) साखळी आणि थिवी येथील दोन मोठे भूखंड ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी काढले आहेत. हे भूखंड खरेदी करायचे असल्यास अर्जदारांकडे कोट्यवधी रुपयांचे भांडवल असणे आवश्यक आहे. मंडळाने निश्चित केलेले हे दर सध्याच्या चालू बाजारभावापेक्षा कमी दिसत असले, तरी लिलावाच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठीच बँक खात्यात किंवा मूळ ठेव (Earnest Money Deposit) म्हणून कोट्यवधी रुपये असणे गरजेचे करण्यात आले आहे.

गोवा गृहनिर्माण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, हरवळे-साखळी आणि माडेल-थिवी येथील हे भूखंड ई-लिलाव पद्धतीद्वारे विकले जाणार आहेत. इच्छुकांना www.goaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर २५ सप्टेंबर २०२६ ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.

हरवळे-साखळी येथील ३,८२८ चौरस मीटर भूखंडाचा मूळ दर २,५०० रुपये प्रति चौरस मीटर ठेवण्यात आला असून या भूखंडासाठी १०० एफआर मंजूर आहे. सध्या साखळी परिसरात निवासी भूखंडांचा बाजारभाव तब्बल १२ हजार रुपये प्रति चौरस मीटरच्या घरात आहे. मंडळाचा दर कमी दिसत असला, तरी या लिलावात उतरण्यासाठी अर्जदाराला सुरुवातीला १ कोटी रुपयांची अनामत रक्कम मंडळाकडे जमा करावी लागणार आहे.

दुसरीकडे, माडेल-थिवी येथील १३,७९५ चौरस मीटरच्या मोठ्या भूखंडाचा मूळ दर १३,५०० रुपये प्रति चौरस मीटर असून यासाठी १५० एफआर मंजूर आहे. थिवी परिसरात सध्या जमिनीचे भाव १८ हजार रुपये प्रति चौरस मीटर आहेत. बाजारभावाच्या तुलनेत मंडळाची मूळ किंमत कमी असली, तरी या लिलावात सहभागी होण्यासाठी ३ कोटी रुपयांची अनामत ठेव जमा करावी लागेल.

एकूण चौरस मीटरच्या हिशोबाने साखळीतील भूखंडाची मूळ किंमत ९५.७० लाख रुपये, तर थिवीतील भूखंडाची मूळ किंमत १८.६२ कोटी रुपये होते. मात्र, ही केवळ मूळ किंमत असून ई-लिलावात सर्वात मोठी बोली लावणाऱ्या अर्जदारालाच हा भूखंड मिळणार आहे. या लिलावासाठी अर्जासोबत ५,००० रुपये अधिक ९०० रुपये जीएसटी असे ५,९०० रुपये नोंदणी शुल्क आकाराले जाईल. लिलावात भूखंड न मिळाल्यास नोंदणी शुल्क परत मिळणार नाही, परंतु जमा केलेली अनामत ठेव अर्जदाराला परत केली जाईल.




हेही वाचा
सर्व पहा